मुंबई : कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची मुभा आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर लसीकरणाच्या टक्क्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. आतापर्यंत ३३ हजार ५०५ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. मात्र दोन दिवसांत पुन्हा कर्मचाऱ्यांची गर्दी ओसरल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी नवव्या दिवशी ७२ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली.
मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम दोन दिवस स्थगित केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतरही आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लस घेण्याबाबत संभ्रम असल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिकेने कर्मचाऱ्यांचे समुपदेशन सुरू केले. संबंधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात रहाणे, कोणत्याही केंद्रांमध्ये जाऊन लस घेण्याची मुभा पालिकेने दिली. त्यानंतर आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने लस घेण्यासाठी केंद्रावर येऊ लागले. गेल्या आठ दिवसांमध्ये ३३ हजार ५०५ कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. यापैकी सर्वाधिक लसीकरण जोगेश्वरी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये झाले आहे. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये पुन्हा कर्मचाऱ्यांची संख्या रोडावली आहे. शुक्रवारी मुंबईतील १२ लसीकरण केंद्रांवर सात हजार ६९७ कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले होते. यापैकी ५५१० म्हणजे ७२ टक्केच कर्मचाऱ्यांनी लस घेतली.