Corona vaccine: दिवसभरात 57 लसीकरण केंद्र बंद; साठा कमी पडण्याचा सिलसिला कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 02:13 AM2021-04-25T02:13:27+5:302021-04-25T06:39:52+5:30
साठा कमी पडण्याचा सिलसिला कायम; तुटवड्यामुळे नागरिकांची निराशा
मुंबई : मुंबईत सलग आठवडाभर लसीचा तुटवडा कायम असून परिणामी लसीकरण केंद्र बंद होण्याचा सिलसिला सुरू आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहर उपनगरात दिवसभरात ५७ लसीकरण केंद्र बंद झाल्याची माहिती दिली आहे. ज्या लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा शिल्लक होता, अशा केंद्रांवर केवळ दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या व्यक्तींना लस देण्यात येत असल्याने नव्याने लस घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती निराश होऊन घरी परतत आहेत.
मुंबईसह राज्यभरात १६ जानेवारीपासून लसीकरण प्रक्रिया सुरू झाली, त्यानंतर दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढण्याच्या टप्प्यावर सामान्यांकडून लसीकरणासाठी प्रतिसाद वाढत गेला. मात्र त्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने सातत्याने लसीकरण प्रक्रियेत अडथळा जाणवत आहे. परिणामी, शहर उपनगरात दिवसागणिक खासगी लसीकरण केंद्र बंद होण्याचा मार्गावर आहेत. शनिवारी दिवसभरात केवळ ३० हजार १९५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
दुसरा डाेस घेणाऱ्यांना प्राधान्य
खासगी लसीकरण केंद्रांना लसींचा पुरवठा करणार नसल्याने स्पष्ट केल्याने दिवसभर नेस्को, वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड केंद्रांसह पालिक रुग्णालयांमध्ये लस घेण्यासाठी लाभार्थ्यांनी गर्दी केलेली दिसून आली. दुपारच्या रणरणत्या उन्हात केंद्र आणि रुग्णालयांपासून अर्धा ते एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर लस घेण्यासाठी रांगा लागलेल्या दिसून आल्या, मात्र सर्व लसीकरण केंद्रावर दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.