Mumbai Local: १५ ऑगस्टपासून तुम्ही करणार आहात का लोकलनं प्रवास? जाणून घ्या, ‘असा’ मिळवायचा पास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 03:09 PM2021-08-10T15:09:48+5:302021-08-10T15:11:54+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे.
मुंबई – १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल ट्रेन(Mumbai Local) ने सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. परंतु ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा होती. रेल्वे बंद असल्याने इतर सार्वजनिक वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला होता. त्याचसोबत विरोधकांनीही लोकल प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी लावून धरली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी १५ ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला एक फोटो पास बनवावा लागेल. हा पास तयार करण्यासाठी सरकार लवकरच एक वेबसाईट किंवा APP तयार करणार आहे. दोन दिवसांत ती सुविधा सुरु होईल. या अँपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या QR Code बनवून घेऊ शकता. ते बनवून रेल्वे स्टेशनवर जा, त्याठिकाणी गेल्यावर तुम्हाला फोटो पास मिळेल. या फोटो पासच्या आधारे तुम्ही लोकलमधून प्रवास करू शकता. हा फोटो पास निवडक ६५ रेल्वे स्टेशनवर मिळणार आहे.
जर तुम्हाला APP च्या भानगडीत पडायचं नाही किंवा क्यू आर कोड बनवणं कठीण असेल तर तुम्ही महापालिकेच्या कार्यालयांमध्ये जाऊन तेथून तुमचा फोटो पास बनवू शकता. आणि हा सर्वात महत्त्वाचं विसरु नका की, फोटो पास मिळवण्यासाठी तुम्हाला कोरोना लसीचे(Corona Vaccine) दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. त्यासाठी लस घेतलेले प्रमाणपत्र सोबत ठेवा अथवा मोबाईलमध्ये डाऊनलोड करा. त्याची छोटी प्रिंट आऊट घेऊन ती लॅमिनेट करा आणि तुमच्या जवळ बाळगा. कारण पास त्याच लोकांना मिळणार आहे ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे तुम्हाला पास मिळू शकतो
राज्य सरकारच्या मदतीने महापालिका अशी व्यवस्था तयार करत आहे जिथं सर्वसामान्यांना प्रवाशांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे पास दिले जाऊ शकतात. एकूण ६५ रेल्वे स्टेशनवर क्यू आर कोड आणि रेल्वे तिकीट देण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी महापालिका, राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात समन्वय साधला जात आहे. मध्य रेल्वेचे महासंचालक अनिल लोहाटी, विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल आणि मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यात चर्चा सुरू असून त्यावर काम सुरू आहे.
क्यू आर कोड बनवण्यासाठी APP दोन दिवसांत सुरू होईल. राज्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता त्याची घोषणा करतील. या APP च्या माध्यमातून घरबसल्या तुम्ही क्यू आर कोड बनवून रेल्वे स्टेशनला जाऊन तिकीट खरेदी करू शकता. जर तुम्हाला ऑनलाइन पद्धत कळत नसेल तर आपल्या घराजवळील महापालिका कार्यालयात जा, त्याठिकाणी नेमण्यात आलेले कर्मचारी तुम्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेत की नाही याची पडताळणी करून तुम्हाला फोटो पास देण्यासाठी मदत करतील.
वाढत्या रेल्वे प्रवासी संख्येवर विचार
सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या मुंबईत जवळपास १९ लाख आहे. त्याचप्रमाणे ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, मीरारोड भाईंदर अशा १० महापालिका परिसरात रेल्वे प्रवाशांची संख्या ३० लाख आहे. येणाऱ्या काळात दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल. त्यासाठी ६५ रेल्वे स्थानकावर क्यू आर कोड मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.