Corona Vaccine : कोविड लसीसाठी महापालिकेचे सहा शहरांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 09:02 PM2021-05-28T21:02:34+5:302021-05-28T21:03:21+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : मुंबईतील लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी महापालिकेने १२ मे रोजी जागतिक स्तरावर निविदा मागविल्या.
मुंबई - कोविडला प्रतिबंध करणाऱ्या लसींच्या खरेदीसाठी महापालिकेने जागतिक निविदा मागविल्या आहेत. त्याचबरोबर आता भगिनी संबंध (सिस्टर सिटी) असलेल्या जगभरातील सहा शहरांमधील प्रशासनांना लस पुरविण्यासाठी पालिकेने पत्र पाठवले आहे. यास जपानमधील योकोहोमा शहराने पत्र पाठवून लस पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे. मात्र, आर्थिक मदत करण्याची हमी दिली आहे.
मुंबईतील लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी महापालिकेने १२ मे रोजी जागतिक स्तरावर निविदा मागविल्या. यास आठ पुरवठादारांनी प्रतिसाद दिला आहे. यापैकी एका पुरवठादाराने माघार घेतली असून उर्वरित सात पुरवठादारांना आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी १ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, आता एक कोटी ८० लाख डोससाठी मुंबई महापालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत.
तर महापालिकेने आता त्याही पुढे जाऊन लस मिळवण्यासाठी सिस्टर सिटींनाही पत्र पाठवून सहकार्य करण्याची विनंती केली आहे. यासाठी अपेक्षित निधीही पालिकेकडून दिला जाईल, असेही पालिकेने आपल्या पत्रातून स्पष्ट केले आहे. संबंधित शहरांशी मुंबई महानगरपालिकेचे जिव्हाळा-सौहार्दाचे संबंध असल्यामुळे लसींचा पुरवठा वाढून पालिकेच्या लसीकरण मोहिमेला वेग येईल, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केला आहे.
ही आहेत सहा भगिनी शहरं....
सिस्टर सिटींमध्ये रशियाची पीटर्सबर्ग, अमेरिकेची न्यू यॉर्क, लॉस एंजेलिस, दक्षिण कोरियाची बुसान, जर्मनीची स्टुटगार्ड आणि जपानच्या योकोहोमा शहरांच्या महापौरांना पत्र लिहून लसींचा पुरवठा करावा अशी विनंती पालिका प्रशासनाने केली आहे. यापैकी जपानच्या योकोहोमा शहराने लसींचा पुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, आर्थिक मदत करू, असे आश्वासन दिले आहे.
सिस्टर सिटी म्हणजे काय?
मुंबईसारखी लोकसंख्या, समुद्र किनारा असे साम्य असलेल्या भौगोलिक व इतरबाबतीत सार्धम्य असलेल्या शहरांना भगिनी शहर म्हणून ओळखले जाते. या शहरांचे एकमेकांशी सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध असतात. शहरांचे प्रतिनिधी नेहमीच एकमेकांच्या शहरांच्या आणि शहराच्या प्रतिनिधींच्या भेटीगाठी घेत असतात.