Corona Vaccine: दिलासादायक ! २४ तास लसीकरणाचा पर्याय पालिकेच्या विचाराधीन; यंत्रणा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 07:30 AM2021-03-22T07:30:26+5:302021-03-22T07:31:08+5:30
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींची परिणामकारकता सारखीच असून, नागरिकांनी चिंता बाळगण्याचे कारण नाही.
मुंबई : जीवनशैली व कार्यालयीन वेळा लक्षात घेता, खासगी रुग्णालयांनी लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी केल्यास अधिकाधिक नागरिक लस घेऊ शकतील. शक्य असल्यास आणि पुरेशी व्यवस्था करणे शक्य असेल तर २४ तास लसीकरणाची सोय करण्याचाही पर्याय विचारात घ्यावा, असे निर्देश महापालिकेने दिले आहेत.
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींची परिणामकारकता सारखीच असून, नागरिकांनी चिंता बाळगण्याचे कारण नाही. मुंबईत महापालिकेच्या २४ व शासकीय आठ अशा मिळून ३२ रुग्णालयात दररोज ४१ हजार जणांना लस दिली जाते. खासगी रुग्णालयांत चार हजार जणांना दररोज लस दिली जाते. खासगी रुग्णालयांत लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
दररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून, खासगी रुग्णालयाने रोज एक हजार जणांचे लसीकरण करावे, असे निर्देश मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले असतानाच लसीकरणासाठी निर्देशित खासगी रुग्णालयांची संख्या ५९ वरून ८० पर्यंत नेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यानंतर रोज एक लाख याप्रमाणे ४५ दिवसांमध्ये ४५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी नगरसेवकांसह सामाजिक, सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.
दिवसाला ५० हजार काेराेना चाचण्या
रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबईतील दैनंदिन चाचण्यांची संख्या २५ हजारांवरून टप्प्याटप्प्याने ५० हजारांवर नेण्याचे लक्ष्य आहे.
नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून काय करणार?
लसीकरणाचे जास्त बुथ, पुरेशी जागा, पिण्याचे पाणी, चहा-कॉफी, बैठक व्यवस्था, पुरेसा कर्मचारी वर्ग, पहिल्या व दुस-या डोससाठी स्वतंत्र कक्ष.