मुंबई : कोरोनाची लस मोफत पुरवण्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे का, असा मुद्दा आता उपस्थित झाला असतानाच, मोफत लसीकरणाबाबतची घोषणा मुख्यमंत्री करतील, इतरांनी श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही, असा चिमटा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांना काढला.
थोरात हे मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लस मोफतच दिली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मांडलेली आहे. आता श्रेयाची लढाई सुरू आहे, ती योग्य नाही. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनीच जाहीर करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मोफत लसीकरणाबाबत शासन स्तरावर चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत धोरण जाहीर केले जाईल, असे त्यांनी सांगितले. मोफत लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी पुण्यात केलेली घोषणा, त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी केलेले विधान आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी डिलिट केलेले ट्विट यातून मोफत लसीकरणाबाबतचा सरकारमधील विसंवाद समोर आला होता.
मोफत लसीकरणाचे श्रेय स्वत:कडे घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याची चर्चा या निमित्ताने झाली. मोफत लसीकरणाबाबत भाजपने राजकारण करू नये, असा टोला शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी हाणला. ते म्हणाले की, या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ घेईल. जनतेच्या हिताचाच निर्णय होईल.
बुधवारी निर्णय होण्याची शक्यता
सुत्रांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक होईल आणि त्यात मोफत लसीकरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सरसकट सर्वांना लस मोफत देण्याबाबत मंत्र्यांमध्ये मतभिन्नता आहे आणि अतिश्रीमंतांना मोफत लस कशाला, असे काही मंत्र्यांचे मत असल्याचे सांगितले जाते.
एकवाक्यता नाही : फडणवीस
मोफत लसीकरणाबाबत कुठले धोरण आहे, ट्विट का केले जातात, का डिलीट केले जातात, याबद्दल मला कल्पना नाही. त्यावर मी बोलणार नाही. मात्र, मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रत्येक पात्र व्यक्तिला केंद्र सरकार मोफत लस देणार आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. प्रत्येक भारतीयाकरिता केंद्र सरकारने व्यवस्था केली आहे आणि त्यातून ही लस उपलब्ध होणार आहे. पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे, असेही ते म्हणाले.