मुंबई : महापालिकेने लस खरेदीसाठी मागविलेल्या जागतिक निविदेला प्रतिसाद देत फायझर अस्ट्राझेनका लस पुरविण्याची तयारी दाखविणाऱ्या कंपनीकडे आगाऊ रक्कम देण्याची मागणी केली आहे. ओटू ब्ल्यू एनर्जी एसआरएल ही कंपनी युरोपमधील रोमानिया देशातील आहे. मात्र इच्छुक कंपन्यांना आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी महापालिकेने एक जूनपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने याबाबत त्यानंतरच निर्णय होणार आहे.कोरोना लसींच्या एक कोटी डोससाठी महापालिकेने १२ मे रोजी जागतिक स्वारस्याची अभिरुची मागवली आहे. यास आतापर्यंत एकूण आठ संभाव्य पुरवठादारांनी अर्ज केला आहे. यामध्ये सात पुरवठादारांनी स्पुतनिक आणि रोमानियाच्या पुरवठादाराने फायझर लस पुरविण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, या पुरवठादाराने एक कोटी डोसची संपूर्ण किंमत पुरवठा सुरु होण्यापूर्वीच मागितली आहे. त्यामुळे या कंपनीच्या अर्जाची व कागदपत्रांची पूर्णपणे छाननी केली जाणार आहे. यापैकी तीन कंपन्यांशी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे.
मुदत संपल्यानंतर होणार अंतिम निर्णय- कार्यादेश मिळाल्यानंतर तीन आठवड्यात लसींचा पुरवठा सुरु करणे पालिकेच्या नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र या मुदतीत लस पुरविणे शक्य नसल्याचे या पुरवठादारांनी सांगितले आहे. - लसींचा पुरवठा करण्यास इच्छुक सर्व पुरवठादारांना सर्व आवश्यक कागदपत्र १ जूनपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. या कालावधीत आणखीन नवीन कंपन्याही अर्ज करू शकतात. मुदत संपल्यानंतर सर्व पडताळणी करुन महापालिका अंतिम निर्णय घेणार आहे.