Join us

Corona Vaccine : पालिकेच्या लस खरेदीला अखेर चार कंपन्यांचा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 9:39 PM

Corona Vaccine : लस उपलब्ध होत नसल्याने मुंबईतील लसीकरण मोहीम थंडावली आहे. त्यामुळे महापालिकेने १२ मे रोजी स्वखर्चाने दीड कोटी लस खरेदीसाठी जागतिक स्तरावर निविदा मागवल्या होत्या.

मुंबई - कोविड १९ ला प्रतिबंध करणाऱ्या लसी खरेदी करण्यासाठी महापालिकेने मागविलेल्या जागतिक निविदेला अखेर चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महापालिकेने या पुरवठादारांना २५ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार एक कोटी लस दिलेल्या मुदतीत महापालिकेला मिळाल्यास लसीकरण मोहिमेला वेग मिळणार आहे. 

लस उपलब्ध होत नसल्याने मुंबईतील लसीकरण मोहीम थंडावली आहे. त्यामुळे महापालिकेने १२ मे रोजी स्वखर्चाने दीड कोटी लस खरेदीसाठी जागतिक स्तरावर निविदा मागवल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यात या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे महापालिकेने निविदा प्रक्रियेला आणखी एका आठवड्याची मुदतवाढ दिली. मात्र आता चार कंपन्यांच्या लशींचा पुरवठा करण्याची तयारी पुरवठादारांनी दाखवली आहे. मात्र यासाठी संबंधित कंपन्यांना काही कागदपत्रांची पुर्तता करावी लागेल. त्यासाठी संबधित कंपन्यांच्या मागणीनुसार त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार २५ मेपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. 

संपूर्ण लसीकरणासाठी ६० दिवसांचे लक्ष्य...

रशियाच्या स्पुटनिक लशीचे एक कोटी डोस मुंबईला मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते. महापालिकेला दीड कोटी डोसची आवश्यकता आहे. त्यानुसार लसींचा साठा उपलब्ध होण्यास सुरुवात झाल्यानंतर ६० दिवसांमध्ये लसीकरण पूर्ण होऊ शकेल, असा पालिकेला विश्वास वाटत आहे. कोविडची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी किमान ६० लाख नागरिकांना लसींचे दोन्ही डोस मिळण्याची गरज आहे. आतापर्यंत मुंबईत २८ लाख ५८ हजार १०३ लोकांनी लस घेतली आहे. यापैकी सहा लाख ५६ हजार ८०४ लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई