Corona Vaccine: गणपती बाप्पा मोरया! कोरोना लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल; महानगरपालिकेने केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 08:20 AM2021-01-13T08:20:52+5:302021-01-13T08:26:57+5:30

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे १,३९,५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत.

Corona Vaccine: Ganpati Bappa Morya! First stock of corona vaccine arrives in Mumbai; Welcome by the Corporation | Corona Vaccine: गणपती बाप्पा मोरया! कोरोना लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल; महानगरपालिकेने केले स्वागत

Corona Vaccine: गणपती बाप्पा मोरया! कोरोना लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल; महानगरपालिकेने केले स्वागत

Next

मुंबई: कोरोना १९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा आज (१३ जानेवारी २०२१) सकाळी ५.३० वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे १,३९,५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती. एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लस साठा वाहनाचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली आहे.

राज्यात पहिल्या दिवशी ५० हजार जणांना मिळेल लस

राज्यात लवकरच लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी राज्यातील ५० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना  कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात येईल. देशभरात १६ जानेवारी रोजी लसीकरण सुरू होणार असून राज्यातील ५११ केंद्रातील १०० जणांच्या बॅचला लसीचा डाेस दिला जाणार आहे. मुंबईत सर्वाधिक ७२ लसीकरण केंद्र असून त्या पाठोपाठ पुण्यात ५५ केंद्र आहेत.

राज्यात पुढील दोन महिन्यांत ८ लाख आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर १०० कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे सामान्य नागरिकांमधील लसीविषयीचे गैरसमज, भीतीही निघून जाईल असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. 

राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात

कोरोना रुग्णांचे राज्यातील मृत्यूचे प्रमाण सध्या २.५४ टक्के असून उपचाराधीन रुग्णसंख्या ५२ हजार आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात असून, ही संख्या १४ हजार ७७९ आहे. तर ठाणे १० हजार १४२ व मुंबईत ७ हजार ३७० काेराेना रुग्ण उपचाराधीन आहेत.

Read in English

Web Title: Corona Vaccine: Ganpati Bappa Morya! First stock of corona vaccine arrives in Mumbai; Welcome by the Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.