Corona vaccine: लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा; कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:14 AM2021-05-18T11:14:03+5:302021-05-18T11:24:41+5:30
सोमवार राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९, ६९९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
सोमवार राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९, ६९९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन.#MahaVaccination
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 18, 2021
राज्यात सोमवारी २६ हजार ६१६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ५१६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मागील काही दिवसात राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांच्या घरात असल्याचे दिसून आले होते. सध्या राज्यात ४ लाख ४५ हजार ४९५ रुग्ण उपचाराधिन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात ४८,२११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ४८,७४,५८२ काेरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.१९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूचे प्रमाण १.५३ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी १३ लाख ३८ हजार ४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.२५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.