Corona Vaccine: 'कोविड-१९' लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात; जाणून घ्या कशी अन् कुठे घ्यायची लस?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 08:27 PM2021-02-28T20:27:22+5:302021-02-28T20:27:35+5:30

BMC Preparation for 3rd phase of Corona Vaccination: महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह निवडक खासगी इस्पितळांमध्येही लसीकरणाची सुविधा, टप्प्याटप्प्याने वाढविणार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांची संख्या

Corona Vaccine: Mumbai Municipal Corporation ready for third phase of 'Covid-19' vaccination | Corona Vaccine: 'कोविड-१९' लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात; जाणून घ्या कशी अन् कुठे घ्यायची लस?

Corona Vaccine: 'कोविड-१९' लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात; जाणून घ्या कशी अन् कुठे घ्यायची लस?

Next

मुंबई : केंद्र शासनाच्या आदेशानुसार 'कोविड-१९' लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवार, दि. ०१ मार्च २०२१ पासून सुरू होत आहे. या टप्प्यात वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच वयाची ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (comorbidity) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिस-या टप्प्यामध्ये केले जाणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात येत आहे.

केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाचा तिसरा टप्पा महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही राबविण्यात येणार आहे. खासगी इस्पितळांपैकी ज्या इस्पितळांमध्ये 'जन आरोग्य योजना' वा केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबविण्यात येत आहेत, अशा खासगी इस्पितळांना या लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीतील निर्धारित रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य असून खासगी इस्पितळात लसीकरणासाठी प्रत्येक मात्रेसाठी कमाल रुपये २५० एवढे शुल्क आकारले जाणार आहे.

केंद्रशासनाची 'जन आरोग्य योजना' राबविण्यात येणा-या, तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५३ खासगी इस्पितळांची यादी प्राप्त झाली आहे. सदर रुग्णालयांमध्ये शासकीय नियमांनुसार पुरेशी जागा, मनुष्यबळ तसेच लसीकरणामुळे होणारे संभाव्य विपरीत परिणाम, व्यवस्थापन इत्यादींसाठी सुविधा उपलब्धता या बाबींचे सर्वेक्षण करुन लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात येईल. त्यानंतर टप्या टप्याने सदर केंद्रांमध्ये लसीकरण सुरु करण्यात येईल. 

दिनांक ०१ मार्च २०२१ पासून खाली नमुद केलेल्या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील कोविड लसीकरण केंद्रात तिसरा टप्प्यातील विनामूल्य लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

१. बी.के.सी जंबो रुग्णालय, वांद्रे

२. मुलुंड जंबो कोविड रुग्णालय, मुलुंड

३. नेस्को जंबो कोविड रुग्णालय, गोरेगाव

४. सेवन हिल्स रुग्णालय, अंधेरी

५. दहीसर जंबो रुग्णालय, दहीसर

महानगरपालिकेच्या अखत्यारीतील इतर १९ लसीकरण केंद्रांमध्ये दि. ०२ मार्च २०२१ पासून तिस-या टप्प्यातील विनामूल्य लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या खासगी इस्पितळातील लसीकरण केंद्रात लसीकरण केवळ त्याच इस्पितळातील आरोग्य कर्मचा-यांसाठी सुरु राहील. राज्य शासनाकडून या संदर्भात धोरण निश्चित झाल्यानंतरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल. यास्तव शासन आदेशान्वये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जी खासगी इस्पितळे 'जन आरोग्य विमा योजना', केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असतील अशा खासगी  इस्पितळांमध्ये ६० वर्षे वय पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील सह-व्याधी असलेल्या नागरिक यांचे लसीकरण १ मार्च पासून सशुल्क पद्धतीने करण्यात येईल.
..
वरील नुसार सदर खासगी इस्पितळांची नावे खालीलप्रमाणे :-

१. एच. जे. दोशी हिंदू सभा रुग्णालय, घाटकोपर

२. के. जे. सोमय्या वैद्यकीय महाविदयालय, शीव

३. एस. आर. सी. सी. चिल्ड्रन रुग्णालय, महालक्ष्मी

वरील तपशिलानुसार संबंधित वर्गवारीत समाविष्ट असणाऱ्या नागरिकांनी 'कोविन डिजिटल' मंचावर (Android App) नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी आगाऊ नोंदणी करता येऊ शकेल किंवा लसीकरण केंद्रातही लसीकरणापूर्वी नोंदणी करता येऊ शकेल.

नोंदणी करताना नागरिकांनी आपली जन्मतारीख व इतर तपशील काळजीपूर्वक नमूद करावा. हा तपशील आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा निर्धारित केलेल्या शासकीय कागदपत्रातील तपशिलानुसार असणे आवश्यक आहे. तसेच लसीकरणाच्या वेळी सदर कागदपत्रे नागरिकांनी आठवणीने सोबत न्यावीत

४५ ते ६० वर्ष वयोगटातील सह-व्याधी असलेल्या २० आजारांची यादी सोबत जोडली आहे. सदर सहआजार असलेल्या नागरिकांनी नोंदणीकृत वैदयकीय सेवा देणा-या व्यवसायिकांकडून प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात दाखविणे आवश्यक आहे. तर ६० वर्षावरील नागरिकांनी वयाबाबतचा योग्य पुरावा (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र इ.) सादर करणे  आवश्यक आहे, अद्याप नोंदणी न झालेले आरोग्य कर्मचारी व कोविड आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यांनी लसीकरण केंद्रात जाऊन आपले ओळखपत्र (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड) लसीकरण केंद्रात सादर करुन आपले लसीकरण करुन घेऊ शकतात.

भारत सरकारच्या निर्देशानुसार 'Co-win Digital Platform' हा दि. १ मार्च २०२१ रोजी सकाळी ९ वाजल्या पासून खुला करण्यात येईल. त्यानंतर वरीलनुसार संबंधित वर्गवारीत असणाऱ्या नागरिकांना स्वत: नोंदणी करता येईल. यास्तव नागरिकांना विनंती करण्यात येते की, कोविन पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.

Web Title: Corona Vaccine: Mumbai Municipal Corporation ready for third phase of 'Covid-19' vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.