Corona Vaccine: मुंबई महापालिकेला दीड लाख लसींचा साठा प्राप्त; ३ दिवस बहुतांशी केंद्रावर होणार लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 07:21 PM2021-04-25T19:21:31+5:302021-04-25T19:22:49+5:30
प्राप्त लस साठ्यात कोव्हॅक्सिन लसीचा साठा अतिशय सीमित असल्याने मोजक्याच केंद्रांवर आणि त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे.
मुंबई : कोविड प्रतिबंध लसीच्या १ लाख ५८ हजार मात्रा बृहन्मुंबई महानगर पालिकेला आज (दिनांक २५ एप्रिल २०२१) प्राप्त झाल्या असून शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे उद्या सोमवार दिनांक २६ ते बुधवार दिनांक २८ एप्रिल २०२१ असे किमान तीन दिवस मुंबईतील लसीकरण सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, प्राप्त लस साठ्यात कोव्हॅक्सिन लसीचा साठा अतिशय सीमित असल्याने मोजक्याच केंद्रांवर आणि त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे ५९ लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३२ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेवून दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिकेला आज कोविशिल्ड लसीच्या १ लाख ५० हजार तर कोव्हॅक्सिन लसीच्या ८ हजार अशा एकूण १ लाख ५८ हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. हा साठा महानगरपालिकेच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवण केंद्रात नेण्यात आला आहे. मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे.
लस साठा उपलब्ध झाल्याने पुढील किमान तीन दिवस खासगी केंद्रांना देखील लसीकरण मोहीम राबवता येईल. लस साठा प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्याचे वितरण सुरू होते. ज्यांनी लस साठा आज नेला नाही त्यांना उद्या सकाळी ८ वाजेपासून लस साठा नेता येईल. ही बाब लक्षात घेता, उद्या सोमवार दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी काही केंद्रांवर लसीकरण प्रत्यक्ष उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.