Corona vaccine: आता वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण, विचारविनिमय सुरू; महापौरांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:43 AM2021-04-26T00:43:03+5:302021-04-26T06:37:51+5:30
महापाैर किशाेरी पेडणेकर; विचारविनिमय सुरू, प्रत्येक मुंबईकराला लस देण्याचे उद्दिष्ट
मुंबई : लसीकरणाचा साठा जसा उपलब्ध आहे, त्याप्रमाणे लस दिली जात आहे. केंद्रावर लस उपलब्ध आहे की नाही, याची माहिती घेऊनच लस घेण्यास जावे. सध्या तरी घरोघरी जाऊन लस देण्याचा मुंबई महापालिकेचा विचार नाही. मात्र, वस्तीपातळीवर जाऊन लस देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी सर्वांना लस द्यायची आहे. एकही मुंबईकर लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, हेच उद्दिष्ट आहे, असे महापाैरांनी सांगितले. कुठल्याही दुर्घटनेत रुग्णांचा नाहक बळी जाऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून महापालिकेच्या सर्व कोविड रुग्णालयातील मेडिकल ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली जात आहे.
वरळी येथील प्लांटची क्षमता सहा ते सात हजार लीटर मेडिकल ऑक्सिजनची असून, वांद्रे येथील मेडिकल ऑक्सिजन प्लांटची क्षमता ही ६० हजार लीटरची आहे. वांद्रे येथे ८० सिलिंडर बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहेत. मुख्य प्लांटला बिघाड झाल्यानंतरही दोन दिवस ऑक्सिजन पुरेल इतकी क्षमता आहे, असे पेडणेकर यांनी सांगितले.
गर्दी करू नका, सरकार जो निर्णय घेईल, तो सर्वांच्या हिताचा!
मुंबईत गर्दी होते तिथे गर्दी कमी व्हावी, ही अपेक्षा आहे. दुकानदारांनी स्वयंसेवक नेमावेत. गर्दी करू नका. सरकार जो निर्णय घेईल तो सर्वांच्या हिताचा आहे. काेराेना प्रतिबंधासाठी आवश्यक आहे. म्हणूनच सहकार्य करा. मिळून काेराेनाला हरवूया, असे आवाहन महापाैरांनी केले. कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. याचे श्रेय मुंबईकर, डॉक्टर, नर्स यांचे आहे. सुरक्षित राहा, स्वत:ची आणि एकमेकांची काळजी घ्या, असेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे रुग्ण सुरक्षित
घाटकोपर येथील एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा या खासगी रुग्णालयात काेराेनाबाधितांसाठी ऑक्सिजनच्या साठ्याची कमतरता जाणवत असल्याची माहिती प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने या रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा पोहोचवला होता. यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले सर्व ६० रुग्ण सुरक्षित होते. महापालिकेच्या सहा रुग्णालयांमधील १६८ रुग्णांचे ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या इतर काेराेना रुग्णालय किंवा काेराेना केंद्रांमध्ये सुरक्षितरीत्या स्थलांतर करण्यात आले होते.
ऑक्सिजनच्या उत्पादनासह वितरणावर लक्ष
पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाने अन्न व औषध प्रशासन तसेच ऑक्सिजन पुरवठादारांशी समन्वय राखण्यासाठी प्रशासनाने सहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पथके उत्पादनासह वितरणावर लक्ष ठेवून आहेत.
काेव्हॅक्सिनचा साठाही दाेन दिवसांत येणार :
पालिका आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, मुंबईत सद्यस्थितीत ५९ सार्वजनिक तर ७३ खासगी लसीकरण केंद्रे आहेत; मात्र कोविड प्रतिबंध लसींचा साठा मर्यादित स्वरुपात असल्यामुळे काही ठराविक केंद्रांवर लस दिली जात आहे. पालिकेकडे कोविशिल्ड लसीचा नवीन साठा आला आहे, दोन दिवसांत कोव्हॅक्सिन लसींचा साठाही येणार आहे. लसीकरण केंद्रांवर दुसऱ्या डोसचे लाभार्थी आणि प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लस देण्यात येईल. त्याचप्रमाणे, नव्याने सुरू होत असलेल्या लसीकरण टप्प्यासाठी वस्त्यांमध्ये लसीकरणाचा प्रस्ताव आहे. तसेच, लसीकरण केंद्राची संख्याही वाढविण्यात येईल.