मुंबई - देशात 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून तिसऱ्या टप्प्यात ६० वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यावेळी, पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर, जवळपास 37 दिवसांनी शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1 मार्च रोजी दुपारी तीनच्या दरम्यान मुंबईतील रुग्णालयात करोनावरील लस घेतली. 'आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात करोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन करोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानंतर, आज पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन शरद पवारांनी दुसऱ्यांदा कोरोना लसीचा डोस घेतल्याचा फोटो शेअर केला आहे.
परिचारिकेच्या कार्यकुशलतेचं कौतुक
शरद पवार यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली, त्यावेळीही श्रद्धा मोरे याच परिचारिका होत्या. तर, दुसरा डोस देतानाही त्यांनी शरद पवारांना लस टोचली. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना पहिल्या लसीची खास आठवण करुन दिली. त्यावेळी, शरद पवार यांनी परिचारिका यांनी दिलेल्या लसीबद्दल आभार मानून त्यांच्या कामाचं कौतुक केलं. तसेच, लस टोचल्याचं कळालंही नाही, अशा शब्दात पवारांनी त्यांच्या कार्यकुशलतेचं कौतुक केलं. दोन्ही वेळेस एकाच परिचारिकेनं त्यांना लस दिल्याचं साम्य पाहायला मिळाल.