असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सची यंत्रणांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जास्तीत जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम सुरू असतानाच स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड लसीकरण केंद्रे म्हणून भूमिका बजावायची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासन आणि मुंबई महापालिकेकडे असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय समितीने मांडला आहे.
असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत लोकांच्या अधिकाधिक संपर्कात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लसीकरण केले जावे, यावर चर्चा झाली. लसीकरणाच्या दृष्टीने सर्व खासगी रुग्णालयांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी मुंबई पालिकेला दिली आहे आणि त्यांना लसीकरणासाठी पालिकेने ठरवलेल्या ठिकाणी जावे लागणार आहे. असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम खन्ना यांनी सांगितले. जास्तीत जास्त सुविधा देणे आणि सरकारचा खर्च कमी करणे, यादृष्टीने व्यवस्थापकीय समितीने बैठकीत खासगी व ट्रस्ट रुग्णालयांना स्वतःच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सुरू करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मांडला आहे.
लसीकरणाच्या मोहिमेचे विकेंद्रीकरण केल्यास अन्य राज्यांच्या तुलनेत राज्य शासन लाेकांपर्यंत अनेक पटीने अधिक पोहोचेल. सर्व सुरक्षा बाळगून तसेच लसीकरणासाठी लागणाऱ्या सिरिंजसारख्या वस्तू रुग्णालये स्वतःच्या वापरणार असल्याने लसीकरणाचा खर्चही खासगी व ट्रस्ट हॉस्पिटलच्या मदतीने विभागला जाईल. गरज वाटल्यास, एमसीजीएम अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आपल्या आवारात लसीकरणाची रुग्णालयांची तयारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
...............................