मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी मानवी शरीरावर चाचण्या सुरू झाल्या आहेत. ही लस तयार होण्यासाठी १२ ते १८ महिन्यांचा कालावधी लागेल, असे सुरवातीला सांगितले जात होते. मात्र, जगभरात संशोधन करणाऱ्या संस्थांनी एकमेकांना सहकार्य आणि माहितीचे आदान प्रदान केल्यामुळेच याच वर्षी लस उपलब्ध होऊ शकेल अशा विश्वास व्यक्त केला जात आहे.कोअलिशन आँफ इपिडीमीक प्रिपेडनेस इनोव्हेशन या संस्थेच्या प्रतिनिधींनी लंडनच्या वृत्तसंस्थांशी बोलताना हा आशावाद व्यक्त केला.कोरोनाला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यासाठी जवळपास १२ संशोधन संस्थांना प्राथमिक टप्प्यावर यश प्राप्त झाले आहे. सीईपीआयने त्यापैकी नऊ संस्थांना आर्थिक सहाय्य दिले आहे. त्यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांची प्राथमिक गुंतवणूक केली आहे. सुरवातीला १२ ते १८ महिन्यांत लस तयार करण्याचे उद्दिष्ट ृहोते. येत्या काही महिन्यांतच सर्व आवश्यक चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करून लस तयार होईल. सुरवातीला ती वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचा-यांसाठी (हाय रिस्क गट) उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. लस यशस्वी झाल्यानंतर जगातील प्रत्येक देशाला ती योग्य पद्धतीने मिळावी यासाठी पुरेशी निर्मिती क्रमप्राप्त ठरेल. त्यासाठी प्रत्येक जगभरातील औषध निर्मिती कंपन्यांच्या सहकार्याने लस निर्मितीसाठी प्रयत्न करावे लागतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.>सावधानतेचा इशारा : लस तयार करण्यासाठी अनेक वर्ष खर्ची पडतात. १२ ते १८ महिन्यांचा कालावधीसुध्दा त्यासाठी कमी पडू शकतो. परंतु, त्यापेक्षाही कमी वेळेत तयार झालेली लस मानवी शरिरासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे निरीक्षण नोंदवत काही अभ्यासकांनी सावधानतेचा इशारासुध्दा दिला आहे. मात्र, लस निर्मितीला अंतिम स्वरूप देताना कोणताही धोका पत्करला जाणार नाही आणि ती सर्वार्थाने सुरक्षित असेल याची खबरदारी घेतली जाईल असे सीईपीआयने स्पष्ट केले आहे.
सामूहिक प्रयत्नांमुळे कोरोना लस दृष्टिपथात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 5:08 AM