मुंबई - कोरोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. पण संकटाचे भान न ठेवता यानिमित्त जी राजकीय हुल्लडबाजी सुरू आहे ती महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारी नाही. महाराष्ट्रात कोरोनावरील लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला व यामागे महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत लसीचे राजकारण सुरू झाले ते निर्घृण आहे असा आरोप सामना अग्रलेखातून शिवसेनेवर केंद्र सरकार आणि भाजपावर केला आहे. एकीकडे लसीवरुन सर्वपक्षीय नेते संतापले असताना, दुसरीकडे स्वाभीमानी शेतकरी संघटनचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे. (Shivsena Target BJP and Central Government over lack of Corona vaccine dose in Maharashtra)
राज्यभरात अनेक ठिकाणी अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. गुरुवारीच अनेक ठिकाणी डोस संपल्यामुळे लसीकरण थांबवण्यात आले होते. शुक्रवारी विदर्भात अनेक जिल्ह्यांतील, विशेषत: ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रे ठप्प पडली होती. पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता परिस्थिती अधिक गंभीर असून तेथे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी केंद्रे सुरू होती. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील बरीच केंद्रे बंद असल्याचे चित्र बघायला मिळाले. राज्यात होत असलेल्या लशींच्या तुटवड्यारुन नेतेमंडळी आक्रमक झाले आहेत. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे.
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना लसीचा तुटवडा असून मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनीही यासंदर्भात केंद्राकडे विचारणा केली आहे. मात्र, यावरुन चांगलच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. भाजपा नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता, राज्याला लसींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा व्हावा, अशी राज्यातील जनेतची इच्छा आहे.
सामनातून केंद्र सरकार व भाजप नेत्यांचा समाचार
राज्यातील कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत लसीचा ठणठणाट आहे व पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान सोडले. पंतप्रधानांचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे. राजकीय भांडणे आहेत, पण त्या भांडणात आपल्याच लोकांचे जीव का घ्यायचे? महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेने कधीतरी आजच्या विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलेच होते. तेवढे तरी इमान राखा. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल असा निशाणा शिवसेनेने भाजपा नेत्यांवर साधला आहे.
पक्षपातपणा वागणे माणूसकीला धरुन नाही
उत्तर प्रदेशला 44 लाख डोस, मध्य प्रदेशला 33 लाख डोस, गुजरातला 16 लाख, कर्नाटक 23 लाख, हरयाणा 24 लाख, झारखंड 20 लाख आणि महाराष्ट्राच्या वाटय़ाला रडतखडत कसेबसे 17 लाख डोस आले. महाराष्ट्राची लोकसंख्या व कोरोना संक्रमणाची तीव्रता सगळय़ात जास्त असताना केंद्राने हे असे पक्षपाती वागणे माणुसकीला धरून नाही, असे मत सामनातून शिवसेनेनं मांडलं आहे. मुंबईतील 51 लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. राज्यातील लसीकरण ठप्प होईल अशी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असताना विरोधी पक्षाने अधिक गांभीर्याने वागण्याची अपेक्षा आहे. गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा अर्धी, पण गुजरातला आतापर्यंत एक कोटी लसी मिळूनही तेथील कोरोना परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा अतिगंभीर बनल्याचे निरीक्षण गुजरात हायकोर्टाने केले. महाराष्ट्राचे मॉडेल वापरा असे गुजरात हायकोर्टाने तेथील सरकारला बजावले.