मुंबई - लस खरेदीसाठी महापालिकेने मागविलेल्या जागतिक निविदेला आतापर्यंत चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. सर्व कंपन्यांनी रशियाच्या स्पुतनिक व्हि लसींचा पुरवठा करण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे या लसीच्या थेट खरेदीसाठी मुंबई महापालिका प्रयत्न करीत आहे. यासाठी रशियन राजदुतांसह या लसीच्या निर्मीतीत व्यावसायिक भागिदार असलेल्या रशियन कंपनीबरोबरही संपर्क केला जात आहे.कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टळावी, यासाठी महापालिकेने दोन महिन्यांमध्ये लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार एक कोटी लस खरेदीसाठी पालिकेने १२ मे रोजी जागतिक निविदा मागविल्या आहेत. मात्र एका आठवड्यात कोणत्याच कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने २५ मेपर्यंत निविदेला मुदतवाढ दिली आहे. मात्र १८ मे रोजी तीन आणि शुक्रवारी आणखी एका कंपनी लस पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे. यापैकी तीन कंपन्या भारतीय असून एक कंपनी ब्रिटनची आहे.मात्र, यापैकी तीन कंपन्या लस निर्मीती करीत नसून फक्त पुरवठादार आहेत. त्यामुळे पालिकेने काही अधिकची कागदपत्र सादर करण्याच्या सुचना या कंपन्यांना केल्या आहेत. त्यासाठीच मंगळवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यादरम्यान पालिकेने रशियन राजदुतांसह थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याचबरोबर या लसीच्या निर्मीतीत व्यावसायिक भागिदार असलेल्या रशियन डायरेक्ट इनव्हेंस्टमेंट फंड या कंपनीशी पत्रव्यवार केला आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या कंपनीचे विशेष कार्यअधिकारी क्रिमील डिमीट्रीव्ह यांना पत्रदेखील पाठवले आहे.
लस खरेदीसाठी खर्चाची तयारी१८ ते ४४ या वयोगटात ९० लाख लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी एक कोटी लस खरेदी करण्यात येणार आहेत. देशात स्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत लक्षात घेता यासाठी ५०० ते ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारसाठी दरमहा दोनशे कोटी रुपये खर्च येत असल्याने ही रक्कम लस खरेदीसाठी मुंबईकरांचे प्राण वाचवणे महत्वाचे असल्याची भूमिका आयुक्तांनी मांडली आहे. ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमनाला साठवता येते.