Corona Vaccine : मुंबईत खासगी लसीकरण केंद्रातच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 08:26 PM2021-04-27T20:26:24+5:302021-04-27T20:30:36+5:30
Corona Vaccine : खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवरच १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नोंदणीकृत नागरिकांना मिळणार लस. १८ वर्षावरील नोंदणीकृत नागरिकांच्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश
मुंबई - कोविड १९ ला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाच्या निर्णायक टप्प्यात शनिवारपासून सुरू होणार आहे. मात्र राज्य शासन आणि महापालिकेच्या ६३ केंद्रांवर यापुढे केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्येच नोंदणीकृत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंगळवारी जाहीर केला आहे.
१ मेपासून सुरु होणाऱ्या १८ वर्षांवरील नोंदणीकृत नागरिकांच्या लसीकरणाच्या पूर्वतयारीबाबत आयुक्तांनी ऑनलाईन आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आश्र्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, संबधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच आरोग्य विभागातील सर्व संबंधीत अधिकारी सहभागी झाले होते. या मोहिमेची व्यापकता पाहता, लस साठ्याची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण त्यासोबत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
गर्दी टाळण्यासाठी लसीकरणाचे विभाजन
मुंबईत १८ ते ४५ या वयोगटात अंदाजे ९० लाख नागरिक आहेत. या सर्वांसाठी दोन डोस याप्रमाणे सुमारे एक कोटी ८० लाख डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे लस उपलब्ध करून घेण्यासाठी पालिकेकडून सरकार आणि लस उत्पादक कंपन्यांकडे पाठपुरावा सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱया बैठकीत निर्णय झाल्यानंतर पालिका पुढील कार्यवाही निश्चित करणार आहे. तरी लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये व त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ
सध्या १३६ लसीकरण केंद्र सुरू आहेत. त्यात शासन आणि महापालिकेचे मिळून ६३ केंद्र आहेत, उर्वरित ७३ खासगी रुग्णालयातील केंद्र आहेत. आणखी २६ खासगी रुग्णालयांकडून मान्यतेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील केंद्रांची संख्या ९९ वर पोहोचणार आहे.
लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा
लस उत्पादक कंपन्यांशी पालिका प्रशासन संपर्कात असून मुंबईला प्राधान्याने लससाठा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत. लससाठ्याचा ओघ तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यानंतर मुंबईत दररोज किमान एक लाख नागरिकांचे लसीकरण केले जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.