Join us

Corona Vaccination: मुंबईत यापुढे ज्यांना मेसेज त्यांनाच लस- महापाैर किशाेरी पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 2:39 AM

लवकरच मिळणार दोन लाख २० हजार लसींचा साठा

मुंबई : कोविड-१९ ला प्रतिबंध करणाऱ्या लसींचा साठा संपत आल्यामुळे मुंबईत शुक्रवारी तणावाचे वातावरण होते. मात्र, लवकरच दोन लाख २० हजार लसींचा साठा मिळणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवार लॉकडाऊनच्या दिवशीही लसीकरण सुरू राहील. परंतु, लसींच्या तुटवड्याचा प्रश्न सुटेपर्यंत ज्यांची नोंदणी होऊन लसीकरणाचा संदेश आला आहे, त्यांनाच डोस मिळेल. यामध्येही दुसऱ्या वेळेचा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.मुंबईत सध्या आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले व ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र, लसींचा साठा कमी असल्याचा फटका शुक्रवारी मुंबईतील अनेक केंद्रांना बसला. लसीकरण मोहीम थंडावण्याची चिन्हे असताना आता कोविशिल्ड लसीचे एक लाख ८० हजार आणि कोव्हॅक्सिनचे ४६ हजार ६३० डोस मुंबईला मिळणार आहेत. मात्र, लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात केंद्रांबाहेर गर्दी करीत असल्याने ताण वाढतो. त्यामुळे कोविडचा डोस घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असेल.शनिवार, रविवारच्या लॉकडाऊनमध्येही लसीकरणमुंबईत शुक्रवार सकाळपर्यंत ८६ हजार लसींचा साठा होता. त्यामुळे १२० लसीकरण केंद्रांपैकी ७१ केंद्रांवर लस देणे शुक्रवारी शक्य झाले नाही. त्यामुळे ४९ केंद्रांवरच लसीकरण सुरू होऊन यापैकी आणखी १९ केंद्रांवरील लस दुपारनंतर संपल्या. दरम्यान, दोन लाख २० हजार लसींचा नवीन साठा येणार असला तरी नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर जाऊ नये, असे आवाहन महापौरांनी केले. ज्यांना लसीकरणाचा संदेश आला असेल त्यांनीच केंद्रावर जावे, असा सल्लाही महापौरांनी दिला. त्याचबरोबर आता दुसरा डोस प्राधान्याने देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शनिवार, रविवार पूर्णतः लॉकडाऊन असले तरी लसीकरणाचा संदेश दाखवून प्रवास करता येईल, त्यासाठी पोलीसही सहकार्य करणार आहेत.‘आधी लस द्या, त्यानंतरच महोत्सव साजरा करू’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिलदरम्यान लस महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अपेक्षा आणि गरजेप्रमाणे लस उपलब्ध झाल्यास निश्‍चितच लस महोत्सव साजरा करू, असा टोला महापौरांनी लगावला.कृपया घराबाहेर पडू नका!शुक्रवार रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्‍यक सेवा, तातडीची कामे वगळता घराबाहेर पडू नये. सरकार, महापालिका नागरिकांच्या सुरक्षेसाठीच उपाय करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महापौरांनी केले.साठा कमी; तरीही देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रातराज्यासह मुंबईत लसींचा साठा कमी असल्याची ओरड होत असताना शुक्रवारी सुमारे ३ लाख जणांना लस देण्यात आली. महाराष्ट्राकडे शुक्रवारी सकाळपर्यंत लसीचे सुमारे १० लाख डोसेस होते. लसींचा साठा मर्यादित असूनही राज्याने आजपर्यंत ९७ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र लसीकरणात पहिल्या क्रमांकावरील सातत्य राखून आहे. 

टॅग्स :कोरोनाची लसकिशोरी पेडणेकर