Join us

CoronaVirus News: "लस शंभर टक्के लोकसंख्येवर यशस्वी होईलच असे नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 3:14 AM

५५वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन

मुंबई : आपण असे गृहीत धरून चाललो आहोत की, लस आली तर आपण कोरोनावर मात करू आणि मग आपल्याला संपूर्णपणे समाधान मिळेल. परंतु प्रत्यक्षात कोणत्याही औषधाने रोगावर सर्वकाळ आणि पूर्णपणे मात केली असे कधीच होत नाही. यामुळे कोरोनाची लस शंभर टक्के लोकसंख्येवर यशस्वी होईलच असे नाही,  असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी केले. मराठी विज्ञान परिषदेच्या पंचावन्नाव्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. यंदा हे अधिवेशन ऑनलाइन पद्धतीने साजरे होत आहे. लसनिर्मिती या विषयावरील अध्यक्षीय भाषणात ते पुढे म्हणाले की, कोणतीही लस किेंवा औषध १०० टक्के लोकसंख्येवर काम करतेच असे नाही. त्यामुळे आपल्याला नेहमीच सावध रहावे लागणार आहे. एखाद्या लसीचा देशातील ५० ते ६० टक्के लोकांवर चांगला परिणाम होत असेल तर तिला यशस्वी लस बोलले जाते, आणि तेव्हाच ती लस तयार करण्यात येते. याचा अर्थ असा की, ३० ते ४० टक्के जनतेला लसीद्वारे संरक्षण मिळणार नाही. लस तयार करण्याची प्रक्रिया व टप्पे याबद्दल ते म्हणाले की संशोधन या प्रथम टप्प्यात रोगकारकाला प्रतिबंध घालण्यासाठी नैसर्गिक किंवा संश्लेषित प्रतिजनाचा शोध घेतला जातो. पेशी-संवर्धन पद्धतीने प्रतिजन मोठ्या प्रमाणावर वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात प्रि-क्लिनिकल करण्यात येते. तिसऱ्या टप्प्यात संशोधन-संस्था, अन्न आणि औषध महामंडळ (एफडीए) यांच्याकडे नवीन लसनिर्मितीसाठी अर्ज करतात. यानंतर एफ.डी.ए.कडून मान्यता मिळाल्यावर मानवी चाचण्यांचे तीन टप्पे पार पाडावे लागतात. चौथ्या टप्प्यात ती संस्था एफ.डी.ए.कडे परवान्यासाठी अर्ज करते. परवाना मिळाल्या नंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची प्रक्रिया सुरू होते. क्वालिटी कंट्रोल टप्प्यात लस कशी कार्य करते, तिचे परिणाम व दुष्परिणाम, लशीचा दर्जा, लशीची कार्यप्रवणता व सुरक्षितता याची काळजी संस्थेला घ्यावी लागते.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या