मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लसीकरणाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सोमवारपासून मोफत लसीकरणावर आणखी भर दिला जाणार आहे. मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जात असतानाच लसींचा साठा कमी पडणार नाही; आणि बनावट लसीची प्रकरणे समोर येणार नाहीत यासाठीही महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेच्या २४९ केंद्रांवर ३० वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस मोफत मिळणार आहे. आता ३० वर्षांवरील व्यक्तींनाही लस देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.
मेगा प्लान
मुंबई महानगरपालिकेने लसीकरण मोहिमेसाठी मेगा प्लान तयार केला आहे. फेरीवाले, रिक्षाचालक यांसारख्या सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे. आठवड्यातील तीन दिवस वॉक-इन लसीकरणासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. सोमवारपासून सुरू होणारा लसीकरणाचा टप्पा हा सर्वात मोठ्या लोकसंख्येचा टप्पा आहे.