Join us

कोरोनाग्रस्तांना मिळाले १५० कोटींचे मेडिक्लेम 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 5:36 PM

मे अखेरीपर्यंत ९७०० जणांचे क्लेम अदा; महाराष्ट्रातील संख्या सर्वाधिक

 

मुंबई : रुग्णालयांमध्ये उपचार घेत कोरोनावर मात करणा-या देशातील ९ हजार ७०० पाँलिसीधारक रुग्णांना विविध विमा कंपन्यांनी उपचार खर्चांचा परतावा (मेडिक्लेम) दिला आहे. ३१ मेपर्यंत ही क्लेमची रक्कम १५० कोटींपर्यंत गेली होती. देशातील एक तृतियांश रुग्ण महाराष्ट्रात आहेत. परंतु, राज्यातील क्लेमची संख्या ही एकूण क्लेमच्या ५८ टक्के आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांवरील उपचारांचा सरासरी खर्च दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत जात असताना परतावा मिळालेली सरासरी रक्कम १ लाख ५५ हजारांच्या आसपास आहे.

भारतात कोरोना दाखल झाल्यानंतर आजाराएवढीच त्यावरील उपचार खर्चांचीसुध्दा दहशत निर्माण झाली होती. परंतु, हा आजार नवीन असला आणि विमा पाँलिसीमध्ये त्याचा समावेश नसला तरी पाँलिसीधाकरांना त्यावरील उपचारांच्या खर्चाचा परतावा देण्याचे स्पष्ट आदेश इन्शुयन्स रेग्युलेटरी अँण्ड डेव्हलपमेंट अथाँरीटी आँफ इंडियाने ( आयआरएडीएआय) दिले होते. त्यानुसार उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांना त्या त्या विमा कंपन्यांकडून खर्चाचे परतावे दिले जात आहेत.  ६ जूनपर्यंत दिलेल्या ९ हजार ७०० क्लेमपैकी ५ हजार ६०० क्लेम हे महाराष्ट्रातील रुग्णांचे आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (१५००), तामिळनाडू (१०२२) आणि पश्चिम बंगाल (५२२) या राज्यांचा क्रमांक असल्याची माहिती हाती आली आहे.

गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवरील उपचारांचा खर्च ससासरी ५ ते ६ लाखांच्या दरम्यान जात आहे. तर, तुलनेने कमी गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारांची बिले दीड ते दोन लाखांच्या आसपास असल्याचे विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. मात्र, कोरोना उपचारांवरील खर्चादरम्यान ग्रोव्हज, मास्कसह पीपीई किटसुध्दा क्न्झुमेबल गुड्स या श्रेणीमध्ये मोडत असल्याने त्यांचा परतावा विमा रकमेतून मिळत नाही. बिलाच्या एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम ही विविध कारणांसाठी कापली जात असल्याचे त्यांनी सांगितले.  

टेलिमेडिसीनचे क्लेमही मिळणार

विमा पाँलिसीधारकांना टेलिमेडिसीन पध्दतीने केलेल्या उपचारांच्या खर्चाचे क्लेम देण्याबाबतचे आदेशही आयआरएडीएआयने गुरूवारी जारी केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करम्यासाठी मेडिकल कौन्सिल आँफ इंडियाने टेलिमेडिसीन उपचारांबाबतची मार्गदर्शक तत्वे २५ मार्च रोजी जारी केली आहेत. रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी ही उपचार पध्दती सध्या मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.   

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस