Join us

Shravan Rathod Died: बॉलिवूडमधील 'सुपरहिट' नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 11:03 PM

श्रवण यांना मुंबईतील एस.एल.रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हापासूनच त्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते. रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्यांची तब्येत स्थिर असली तरी चिंताजनक असल्याचे म्हटले होते. 

मुंबई - संगीतकार नदीम श्रवण यांनी एकाहून एक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. या जोडीने नव्वदीचा काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. याच जोडीतील श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाली होती. दुर्दैवाने आज त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. आज मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती.

श्रवण यांना मुंबईतील एस.एल.रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हापासूनच त्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते. रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्यांची तब्येत स्थिर असली तरी चिंताजनक असल्याचे म्हटले होते. दुर्दैवाने आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसहसंगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

नदिम सैफी आणि श्रवण राठोड यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आशिकी या चित्रपटातील गीतांमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नदिम यांचे नाव आल्यानंतर ही जोडी तुटली. नदिम गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होते.

नदिम श्रवण यांच्या जोडीने दिल है के मानता नही, साजन, सडक, साथी, दिवाना, फुल और काटे, राजा हिंदुस्तानी, जान तेरे नाम, धडकन, राजा, परदेस, दिलवाले यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले असून त्यांची सगळीच गाणी आजही हिट आहेत.  

टॅग्स :संगीतकोरोना वायरस बातम्यामृत्यूबॉलिवूड