मुंबई – चीननंतर जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत देशातही पसरली आहे. देशात कोरोना व्हायरसची संख्या १२५ च्या वर पोहचली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. तसेच मुंबईत ६४ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सरकारकडून विशेष खबरदारी घेण्याचं काम सुरु आहे. राज्यभरात आरोग्य यंत्रणांना अलर्टवर ठेवलं आहे.
राज्यात शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे, तर खासगी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्रालयातही येणाऱ्या बाहेरच्या लोकांनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अशातच राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. सध्या नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार या महानगरपालिका, ९ नगरपरिषद, १० पोटनिवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या याच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे.
मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या गंभीर परिस्थितीचा विचार करता निवडणुका घेणे उचित राहणार नाही. या निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात व्हाव्यात या दृष्टीकोनातून राज्य सरकारने या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे ज्या टप्प्यावर निवडणुकांचे कामकाज आहे त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत निवडणूक स्थगित करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. त्याचसोबत परिस्थितीचा आढावा घेऊन योग्यवेळी निवडणूक कार्यक्रम सुरु करण्याचे आदेश जारी करु असं सांगण्यात आलं आहे.
याबाबत राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यावरुन राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. दरम्यान, कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळा, कॉलेजला सुट्टी दिली आहे. लोकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. इतकचं नाही तर मंत्रालयातही सर्वसामान्य लोकांना येण्यास मज्जाव घातला आहे. अशातच मंत्रालयातील एक अधिकारी कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या चाचणीसाठी दाखल झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच या अधिकाऱ्याचा भाऊ आणि वहिनी अमेरिकेहून आले होते. ते सर्व कोरोनाग्रस्त निघाले हा अधिकारी सर्वांनाच भेटत होता. त्यामुळे मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालये काही दिवस बंद ठेवण्याचा सरकारचा विचार आहे अशी माहिती मिळत आहे.