Corona Virus : केईएम रुग्णालयातील ९ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 06:28 AM2021-10-28T06:28:06+5:302021-10-28T06:29:09+5:30
Corona Virus: केईएम रुग्णालयातील क्लिनिकल फार्मालॉजिकल विभागातील हे बाधित असून यात डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी परळ येथील केईएम रुग्णालयात ४० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते, या संसर्गाला ब्रेक थ्रू संसर्ग म्हणतात. म्हणजेच लसीकऱणानंतर झालेला संसर्ग, अशी माहिती पालिकेने दिली. यानंतर आता पुन्हा एकदा केईएम रुग्णालयातील नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
केईएम रुग्णालयातील क्लिनिकल फार्मालॉजिकल विभागातील हे बाधित असून यात डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. केईएम रुग्णालयातील नियमित तत्त्वावर कोरोना चाचण्या करण्यात येतात, आतापर्यंत एक हजारांहून कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, दैनंदिन ४५० – ५०० चाचण्या केल्या जातात, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
नऊ बाधितांचे निदान झाल्यामुळे खबरदारी म्हणून सर्व विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, कोरोनाविषयक योग्य नियमावलीचे पालनही कऱण्यात येत आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.