Corona Virus: ‘कोरोना’चा मृत्यूदर फक्त दोन टक्के; काळजी घ्या, धसका नको
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 02:36 AM2020-03-12T02:36:03+5:302020-03-12T02:36:46+5:30
जर तुमचे नाक गळत असेल आणि थुंकीचा त्रास असेल, तर ही कोरोनाची लक्षणे नव्हेत
पुणे : ‘कोरोना आता तरी असाध्य आजार आहे हे खरे असले, तरी घाबरून जाण्याची गरज नाही. अन्य आजारांच्या तुलनेत कोरोनाचा मृत्यूदर २ टक्के इतका कमी आहे. कोरोनाला साध्या-साध्या उपायांनी प्रतिबंध करता येणे शक्य आहे व ते मात्र काळजीपूर्वक करा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,’ असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.
भोंडवे म्हणाले, ‘‘नागरिक भांबावून गेले आहेत. मात्र, घाबरून जाण्याने गोंधळ निर्माण होतो, यंत्रणांना काम करणे अवघड होते. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये व मुख्य म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. उपाय नसला तरी आजार होऊच नये, यासाठी आपण पूर्ण काळजी घेऊ शकतो.
आजार टाळण्यासाठी
- पूर्ण शिजवलेले अन्न खावे.
- तीन लिटर पाणी रोज घ्यावे.
- पुरेशी आणि नियमित झोप घ्यावी, जागरणे टाळावीत.
- धूम्रपान टाळावे.
- मद्यपान टाळावे.
लक्षात ठेवा
जर तुमचे नाक गळत असेल आणि थुंकीचा त्रास असेल, तर ही कोरोनाची लक्षणे नव्हेत. कारण कोरोना व्हायरसमुळे कोरडा खोकला येतो व नाक गळत नाही.
कोरोनाबाबत गैरसमज
- पूर्ण शिजविलेल्या मांसाहारातून कोरोना व्हायरस पसरू शकत नाही.
- चीनमधून आयात झालेल्या गोष्टी वापरू नयेत, हे चुकीचे. आयात वस्तूंतून विषाणू पसरत नाही. तरीही शंका असल्यास जंतुनाशक औषधांनी त्या धुऊन घ्याव्यात.
- चीनमधून आयात उपकरणे, रंग, पिचकाऱ्या, पुस्तके यांतूनही कोरोना विषाणू पसरत नाही. शंका असल्यास निर्जंतुक हॅण्डग्लोव्ह्ज वापरावेत.
लसूण खाल्ल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होत नाही, हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. यासाठी कोणतेही संशोधन अस्तित्वात नाही. अशा प्रकारची कोणतीही वनस्पती अथवा औषध आजमितीला शास्त्रीय पद्धतीने मान्यताप्राप्त नाही.
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास रुग्ण मृत्युमुखी पडतो, हा गैैरसमज आहे. आज भारतभरात केंद्र सरकारने आणि महाराष्ट्रात राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने, त्याप्रमाणे आयएमएच्या सदस्य डॉक्टरांनी अगदी पहिल्या दिवसापासून हा आजार ओळखून त्याचे निदान त्वरित करून रुग्णाला आवश्यक असल्यास रुग्णालयात भरती करण्याबद्दल मोहीम राबवली आहे.
काय आहे कोरोना?
हा एक विषाणू आहे. तो वेगाने वाढतो. वेगाने एका व्यक्तीकडून दुसºया व्यक्तीकडे पसरतो. आपल्या श्वसनसंस्थेला बाधित करतो.
कोरोना विषाणूची बाधा झाली, तरी रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. यात रुग्ण दगावण्याची शक्यता अत्यल्प आहे.
लक्षणे : - कोरोना विषाणू प्रथम घशात संसर्ग करतो. प्रादुर्भावानंतर घसा खवखवतो. साधारणपणे ३-४ दिवस घसा खवखवण्याची लक्षणे दिसतात. प्राथमिक संसर्गानंतर हा विषाणू श्वसनसंस्थेतील द्रवांमध्ये मिसळतो. श्वासनलिकेत शिरून फुप्फुसांना बाधित करतो. त्यामुळे न्युमोनिया होतो. साधारणपणे ५-६ दिवसांत हा घटनाक्रम होतो. उच्च ताप येतो व श्वास घेण्यास त्रास होतो. रुग्णाला अक्षरश: नाक बंद झाल्यासारखे वाटते.
कोरोना विषाणू दोन प्रकारे पसरतो
रुग्णाच्या खोकल्यातून रुग्ण खोकल्यावर हवेत तुषार उडतात. हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात. या तुषारांतील कणांमध्ये विषाणू असतात. आजूबाजूच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यावर त्यातून त्याचा संसर्ग होतो.
वस्तूंच्या स्पर्शातून. रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. त्या वस्तूंना आपल्या हाताचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू हातांना चिकटतात. त्यानंतर जर हात चेहºयाला किंवा नाकाला लावला, तर ते आपल्या श्वसनमार्गातून जाऊन संसर्ग होतो.
जास्त धोका कुणाला?
गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, दमा, जुना व सतत बळावणार खोकला, कर्करोगाचे उपचार चालू असल्यास.
असा होतो संसर्ग
कोरोना व्हायरसचा आकार बराचसा मोठा असून विशिष्ट प्रकारच्या मास्कच्या साह्यानेही त्याला अटकाव करता येतो.
एखाद्या धातूवर जेव्हा हा व्हायरस पडतो, तेव्हा तेथे तो कमीत कमी १२ तास राहतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही एखाद्या धातूला हात लावाल, तेव्हा लगेच सॅनिटायझरने किंवा साबणानेही हात स्वच्छ धुवा.
कापड्यांवर हा विषाणू ६ ते १२ तास जिवंत राहतो. साबणाने कपडे स्वच्छ धुणे आवश्यक ठरते. लोकरी कपडे वारंवार धुणे जमत नसल्यास ते कडक उन्हात कमीत कमी चार तास तरी वाळत घालावेत.
काय काळजी घ्यावी?
कोरोनापासून बचावासाठी वारंवार गरम पाणी प्यावे. जास्त काळ उन्हात राहावे. थंड पदार्थांचे (उदा.- बर्फ) सेवन टाळावे. संसर्ग बहुतांश करून सार्वजनिक ठिकाणी होतो. विषाणू हातावर केवळ ५-१० मिनिटे जिवंत राहतो. मात्र, त्या काळातच जर नाकाशी संपर्कात आला तर संसर्ग होतो. त्यामुळे वारंवार हात स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे.