Join us

Corona Virus: बॉलीवूडलाही कोरोनाचा फटका; चित्रपटांचे शूटिंग रद्द; ‘आयफा’ सोहळा पुढे ढकलला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 4:30 AM

कलाकारांनी लावले मास्क : आग्रह करणाऱ्या चाहत्यांना सेल्फी देण्यासही नकार

अजय परचुरे मुंबई : जगभरात कोरोनाची दहशत असतानाच त्याचा फटका आता बॉलिवूडलाही बसला आहे. कोरोना विषाणूच्या भीतीने अनेक सेलिब्रिटींनी आपले आगामी कार्यक्रम रद्द केले आहेत. तर काहींना सिनेमाचं शूटींग पुढे ढकललं आहे. यामुळे बॉलिवूडचं कोट्यावधींचं नुकसान झालं आहे. बॉलीवूड सिताऱ्यांची मांदियाळी असलेल्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यालाही याचा फटका बसला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस हा सोहळा मध्य प्रदेशात रंगणार होता; मात्र कोरोनाच्या कारणास्तव हा सोहळाच आता पुढे ढकलला आहे.

यंदाच्या पॅरिस फॅशन वीकला दीपिकाची खास हजेरी असणार होती. मात्र जगभरातली कोरोनाची दहशत पाहता दीपिकाने तिचा हा दौराच रद्द केला आहे. बॉलीवूड स्टार वरूण धवन आणि त्याची गर्लफ्रेण्ड नताशा हे लवकरच लग्नबंधनात अडकणार होते. थायलंडमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे हे विवाहस्थळही आता बदललं जाणार आहे.

सध्या एअरपोर्टवर फिरताना स्टार्स आरोग्याची खबरदारी घेताना दिसून येत आहे. कलाकार मास्क आणि हॅडग्लोज घालून फिरत असताना दिसत आहेत. कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श होऊ नये याची काळजी घेत आहेत. कलाकार पाहिल्यावर प्रेक्षक गर्दी करतात मात्र सध्या स्टार्स आपल्या चाहत्यांना सेल्फी देण्यासही नकार देत आहेत.

काही बॉलीवूड कलाकारांनी मुंबईत जाहीर कार्यक्रमांची निमंत्रणही धुडकावून लावली आहेत.बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनला मुंबईत दोन जाहीर कार्यक्रमांचं निमंत्रण आलं होतं. मात्र दोनही कार्यक्रमांना त्याने नाही म्हटलं आहे. बॉलीवूड सिनेमांची चित्रीकरण आणि त्यांचे प्रदर्शन पुढे गेल्याने बॉलीवूडच्या निर्मात्यांचे आणि कार्यक्रमांच्या आयोजकांचे करोडोचे नुकसान मात्र होत आहे.

‘सूर्यवंशी’चे प्रदर्शन पुढे ढकललेरोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट २४ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. त्याचे प्रदर्शन आता पुढे ढकलण्यात आले आहे. अक्षयकुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगण यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.‘गुड न्यूज’ची प्रतीक्षाअक्षयकुमारचा ‘गुड न्यूज’ हाँगकाँगमध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. सलमान खानच्या आगामी ‘राधे’ या सिनेमाचं शूटिंग लवकरच थायलंडमध्ये होणार होतं. पण कोरोनामुळे या सिनेमाचं थायलंडमधलं चित्रीकरणच पुढे ढकललं आहे. रॉनी स्क्रूवाला यांनी आपल्या ‘सितारा’ या सिनेमाचं केरळमधलं चित्रीकरण थांबवलं आहे. ही टीमला चित्रीकरण न करताच केरळमधून परत मुंबईला परतली आहे.

टॅग्स :कोरोनाबॉलिवूड