Corona Virus: कोरोनाचा फटका आंतरराष्ट्रीय पर्यटनाला; विमानतळावरच रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:23 AM2020-03-11T01:23:58+5:302020-03-11T01:25:07+5:30
आशिया खंडातील हवाई प्रवाशांमध्ये २४ टक्के घट
मुंबई - कोरोनाचा फटका जगभरातील हवाई वाहतुकीला बसू लागला आहे. आशिया खंडातील हवाई प्रवाशांच्या संख्येत यामुळे २४ टक्के घट झाली आहे. कोरोनामुळे हवाई वाहतुकीचे अधिक नुकसान होण्याची भीती एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलने वर्तविली आहे.
या नुकसानीमधून वाचण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज एसीआयने व्यक्त केली आहे. विविध देशांतील सरकारे व विमान वाहतूक नियामक संस्थांनी याबाबत गांभीर्याने विचार करून उपाय योजण्याची गरज आहे; अन्यथा आणखी मोठा फटका बसण्याची भीती आहे.
२०२० च्या पहिल्या तिमाहीत हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाचा विळखा सर्वांत जास्त चीनला बसला असून, कोरोनाचा उगमदेखील चीनमधून झाला आहे.
चीन, हाँगकाँग, कोरिया या आशिया खंडातील प्रमुख देशांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचे रुग्ण सर्वांत अधिक प्रमाणात आढळल्याने या देशांच्या हवाई वाहतूक सेवा विस्कळीत झाल्या. कोरोनामुळे हवाई कंपन्यांना ३ बिलीयन डॉलर्सचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उपाययोजना राबवण्याची गरज आहे.
विमानतळावर प्रवाशांची मोठी रांग
वमानतळावर दुसऱ्या देशांतून येणाºया विमान प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. सुरुवातीला केवळ चीनमधून येणाºया प्रवाशांची तपासणी होत होती. आता इतर देशांतून येणाºया सर्व प्रवाशांची तपासणी होत असल्याने प्रवाशांची मोठी रांग लागत असल्याचे चित्र आहे. तीन तासांपासून सहा तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाºया सर्व परदेशी विमानांमधील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. मुंबई विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असल्याने, मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे व लँडिंग येथे होत असल्याने प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे थर्मल स्क्रीनिंगसाठी मोठी रांग लागत असल्याचे चित्र विमानतळावर दिसत आहे. अधिक काळ तपासणीसाठी उभे राहावे लागत असल्याने, या कालावधीत अनेकांना प्रार्दुभाव होण्याची भीती वर्तविली जात आहे.
सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्देश असल्याने विमानतळावर एअरपोर्ट हेल्थ आॅर्गनायझेशनच्या कामात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. विमानतळावर सध्या २७ थर्मल स्कॅनर्स वापरले जात असून, पूर्वीच्या तुलनेत कर्मचाºयांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. मात्र, त्या तुलनेत प्रवाशांची संख्या मोठी असल्याने, प्रवाशांना अनेक तास तपासणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
ही माहिती बंधनकारक
परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला स्वघोषणापत्र द्यावे लागत असून, त्यामध्ये गेल्या २८ दिवसांतील प्रवासाची माहिती द्यावी लागते. प्रवाशाचे नाव, पासपोर्ट क्रमांक, विमान प्रवासाची माहिती, देशात कुठल्या भागात वास्तव्य करणार तेथील पत्ता, मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवाशाला ताप, खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्यास त्याबाबतची माहिती नोंदविणे बंधनकारक आहे. इमिग्रेशन काउंटरवर हे स्वघोषणापत्र जमा करून घेतले जात आहे.
आंतरराष्ट्रीय जहाज पर्यटनावर परिणाम
कोरोनाचा धोका जगभरात दिवसेंदिवस वाढत चालल्याचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय जहाज पर्यटनाला बसतो आहे. भारतात परदेशी जहाजांच्या आगमनावर ३१ मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत येणाºया १० आंतरराष्ट्रीय जहाजांचे आगमन स्थगित झाले आहे.
जगभरातील दोनतृतीयांशपेक्षा अधिक प्रवाशांनी त्यांच्या ठरलेल्या प्रवासामध्ये असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांचे आरक्षण रद्द केले आहे. जगात अनेक देशांमध्ये कोरोना रुग्ण असलेल्या देशांतील जहाजांच्या प्रवेशावर व पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे धोका टाळण्यासाठी अनेक जहाज कंपन्यांनी आपले दौरे रद्द केले आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ३१ मार्चपर्यंत १० विदेशी जहाजांचे आगमन होणार होते. मात्र आता या निर्बंधामुळे मुंबईत येणारी ही १० विदेशी जहाजे येण्याचे रद्द करण्यात आल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली. मात्र देशांतर्गत प्रवास करणाºया जलेश कर्णिका व अँग्रिया या जहाजांच्या प्रवासावर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत, असे भाटिया यांनी स्पष्ट केले. देशांतर्गत प्रवास करणारी ही जहाजे देशातल्या देशात प्रवास करीत असल्याने त्यांचे प्रवास नियोजनाप्रमाणे होत असल्याचे भाटिया यांनी स्पष्ट केले. मात्र, या जहाजांवर प्रवास करताना प्रवाशांनी व कर्मचाºयांची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची थर्मल तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई बंदरात आतापर्यंत आलेल्या जहाजांमधील प्रवासी व कर्मचाºयांची थर्मल तपासणी करण्यात आली व त्यामध्ये कोणताही संशयास्पद रुग्ण आढळलेला नाही. नौकावहन मंत्रालयाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी मुंबई पोर्ट ट्रस्ट अतिशय गांभीर्याने करत असल्याचे सांगण्यात आले.