Corona Virus: आता कोरोना ‘फोबिया’चा मनस्ताप; मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 01:38 AM2020-03-12T01:38:43+5:302020-03-12T01:38:59+5:30
कोरोनाचे माध्यमांमध्ये होणारे चित्रण सर्वसामान्यांना घाबरवणारे आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अधिक जबाबदारीने कोरोना विषाणूसंदर्भात वृत्तांत दाखविले पाहिजेत
मुंबई : कोरोनाच्या (कोविड - १९) वाढत्या दहशतीमुळे जगभरात सर्वत्र हाहाकार माजला आहे. आता राज्यातही कोरोनाच्या रुग्णांचे निदान झाल्याने या भीतीमध्ये भर पडली आहे. परिणामी, सामान्य नागरिक कोरोनाला घाबरून डॉक्टरांकडे गर्दी करत आहेत.
डॉक्टरांकडे वैद्यकीय तपासण्यांसाठी आग्रह धरत असल्याने अशांचे मानसोपचारतज्ज्ञांकडे समुपदेशन सुरू आहे. कोरोनाचा असा ‘मनस्ताप’ वाढू लागल्याने घाबरून न जाता प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
कोरोनाविषयी समाज माध्यमांवर फॉरवर्ड होत असलेल्या पोस्ट्स, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातील वृत्तांतामुळे जनतेत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सामान्यत: सर्दी, खोकला असलेली, प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले नागरिकही डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी रांगा लावत आहेत. याशिवाय, वैद्यकीय तपासण्यांसाठी डॉक्टरांकडे तगादा लावत आहेत. याविषयी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नताशा काटे यांनी सांगितले, मागच्या चार दिवसांत सातहून अधिक रुग्णांचे ‘कोरोना फोबिया’बद्दल समुपदेशन सुरू आहे. विविध माध्यमांतून कोरोनाच्या वृत्तांताबाबत सर्वसामान्यांवर होणारा मारा हे कोरोना फोबिया मागचे महत्त्वाचे कारण आहे. शिवाय, प्रत्येकाच्या हातात असलेले स्मार्टफोनही घातक आहेत. सोशल मीडियामुळे कोरोनाबाबत गैरसमज वेगाने पसरत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले, कोरोनाचे माध्यमांमध्ये होणारे चित्रण सर्वसामान्यांना घाबरवणारे आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अधिक जबाबदारीने कोरोना विषाणूसंदर्भात वृत्तांत दाखविले पाहिजेत. माझ्याकडेही दोन रुग्णांचे समुपदेशन सुरू आहे. ते दोन्ही रुग्ण सुदृढ आहेत, मात्र कोरोनाविषयी सातत्याने कानावर येणाऱ्या गोष्टींमुळे ‘पॅनिक अॅटॅक’ येऊन त्यांनी घरातून निघणे बंद केले. त्यामुळे आता त्यांचे समुपदेशन सुरू आहे.
घाबरू नका, काळजी घ्या, तज्ज्ञांचा सल्ला
- ऐकीव माहिती, अफवांवर विश्वास ठेवू नका
- लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता मान्यताप्राप्त डॉक्टरांचा सल्ला घ्या
- जवळच्या सरकारी रुग्णालयात ‘कोरोना विषाणू’च्या निदानाची तपासणी करून घ्या
- डॉक्टरांनी सांगितल्यास रुग्णालयात त्वरित भरती व्हा
- अशास्त्रीय उपचार, भोंदू इॉक्टरांचे उपचार घेऊ नका