Corona Virus: कोरोनाचा रुग्ण सापडलेला परिसर पालिकेने काढला पिंजून; कोणालाही लागण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 02:36 AM2020-03-14T02:36:54+5:302020-03-14T02:37:26+5:30

२४ तासांत २८ संशयितांची तपासणी

Corona Virus: Corona patient found trap removed by the municipality | Corona Virus: कोरोनाचा रुग्ण सापडलेला परिसर पालिकेने काढला पिंजून; कोणालाही लागण नाही

Corona Virus: कोरोनाचा रुग्ण सापडलेला परिसर पालिकेने काढला पिंजून; कोणालाही लागण नाही

Next

मुंबई : दुबईवरून आलेल्या घाटकोपर येथील रहिवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे महापालिकेचे पथक सतर्क झाले आहे. शुक्रवारी दिवसभरात डॉक्टरांच्या पाच पथकांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत ४६० घरांची पाहणी केली. सुदैवाने त्यात कोरोनाची लक्षणे असलेली एकही व्यक्ती आढळून आलेली नाही. गेल्या २४ तासांमध्ये २८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी कोणालाही कोरोनाची लागण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत मुंबईत तीन आणि ठाण्यातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. घाटकोपरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याला तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खबरदारी म्हणून महापालिकेने या रुग्णाला आता कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. या तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सात व्यक्तींचीही कस्तुरबा रुग्णालयात तपासणी करण्यात
आली. या सात व्यक्तींना सध्या १४ दिवस वेगळे ठेवून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येणार आहे.

कोरोनोचा रुग्ण वास्तव्यास असलेल्या इमारतीमधील सर्व लोकांची शुक्रवारी डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली. एका दिवसात तब्बल ४६० घरांची पाहणी करून कोणामध्ये कोरोनाचे लक्षण दिसून येत आहे का? याची खात्री करून घेण्यात आली. सुदैवाने यापैकी कोणालाही अद्याप या आजाराचा संसर्ग झालेला नाही, असे उप प्रमुख कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितले.

रुग्णालयाशी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन
कोरोनाचा प्रसार प्राणी-पक्ष्यांच्या माध्यमातून नव्हेतर, बाधित रुग्ण खोकल्याने, शिंकल्याने किंवा जवळचा संपर्क झाल्याने लागण होत आहे. सर्दी, ताप, खोकला, उच्च ताप अशी लक्षणे या आजारात दिसून येत आहेत. ही लक्षणे औषधोपचार करूनही पाच दिवसांत कमी न झाल्यास जवळचा डॉक्टर किंवा पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. डॉ. यशस्वी केणी, डॉ. दक्षा शाह, डॉ. जयंती शास्त्री यांनी ही माहिती दिली.

अशी केली महापालिकेने तयारी खाटांची संख्या
कस्तुरबा रुग्णालय - ७०, एचबीटी रुग्णालय - २०, कुर्ला भाभा - १०, वांद्रे भाभा - १०, राजावाडी रुग्णालय - २०, फोर्टिस रुग्णालय मुलुंड - १५, बीपीटी रुग्णालय - ५०, बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रुग्णालय - ३० खाटा अशा एकूण २३३ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
गंभीर परस्थिती असलेल्या रुग्णांना आयसीयू सेवा मिळण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात सोय करण्यात आली आहे.
बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना वेगळे ठेवण्यासाठी अंधेरी येथील सेव्हन हिल रुग्णालयात तीनशे खाटांची सोय करण्यात आली आहे. तसेच ३० खाटांचा विलगीकरण कक्षही उभारण्यात आला आहे.

Web Title: Corona Virus: Corona patient found trap removed by the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.