मुंबई : मुंबईत एकीकडे लसीकरणाच्या मोहिमेला वेग येत असून दुसरीकडे मुंबईकरांसह पालिका प्रशासनासाठी दिलासादायक बाब म्हणजे येथील पॉझिटिव्हिटीचे प्रमाण चार टक्क्यांखाली आले आहे. गेले चार दिवस सातत्याने हा दर चार टक्क्यांहून कमी असल्याने मुंबई आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.
मुंबईत २० जानेवारी रोजी १५ हजार ६७२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ३.९ टक्के हाेते, तर १९ जानेवारी रोजी १८ हजार ८६७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या दिवशी सर्वांत कमी म्हणजे पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अवघे तीन टक्के होते. तर, १७ आणि १८ जानेवारी रोजी ते ३.८ टक्के नाेंदवण्यात आले. ११ जानेवारीपासून हे प्रमाण ५ टक्क्यांच्या पुढे गेले नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
काेराेना पाॅझिटिव्हिटीचे प्रमाण कमी झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. याविषयी महापालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबई शहर तसेच उपनगरांत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. मुंबईत दर दिवशी सरासरी १६ हजार कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कायमच २० ते ३० टक्के म्हणजे सरासरी ११.४४ एवढे हाेते.
रुग्णालयातील ७० टक्के खाटा रिक्तसप्टेंबर महिन्यापासून मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत ८० टक्क्यांनी घट.पालिका आणि खासगी रुग्णालयांत केवळ ३० टक्के खाटांवर रुग्ण, ७० टक्के खाटा रिक्त.उपचाराधीन असलेल्या रुग्णांत वीस दिवसांत १७ टक्क्यांनी घट.मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के.रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४७ दिवस.