Join us

corona virus : राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 9:38 PM

एमपीएससीकडून २६ एप्रिलला घेतली जाणार परीक्षा

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक हिताचाविचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या ५ एप्रिल रोजी आयोजित केलेली ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०’ पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयांसह सर्व अभ्यासिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसमोर गावाकडील घरी जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.परंतु,परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आयोगाकडून अधिकृत घोषणा केली जात नाही; तोपर्यंत काही विद्यार्थ्यांनी पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, हॉटेल्स ,खानावळ बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे आयोगाने ५ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी,अशी मागणी ‘एमपीएससी स्टुडेंट राईटस’संघटनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी केली होती. अखेर आयोगाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०’ येत्या ५ एप्रिल रोजी आता २६ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. तसेच ‘महाराष्ट्र दुप्पम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२०’ येत्या ३ मे एवजी १० मे रोजी घेतली जाणार आहे,असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणा-या उपाययोजना विचरात घेऊन, परीक्षांच्या आयोजनाबाबत आयोगाकडून फेर आढावा घेतला जाणार आहे. त्या संदर्भातील माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयोगाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी,असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :एमपीएससी परीक्षापुणेकोरोना वायरस बातम्या