Corona Virus : मोठा दिलासा! मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात आज कमालीची घट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 08:42 PM2022-01-10T20:42:05+5:302022-01-10T20:43:36+5:30
मुंबईत दैनंदिन रुग्णांमध्ये घट झाली असून हा आकडा 20 हजारांवरून 13 हजारांवर पोहोचला आहे.
मुंबई - राज्यात गेल्या 8 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशीपासून कोरोना रुग्णसंख्येत दिवससेंदिवस मोठी वाढ होत हा आकडा तब्बल 20 हजारांवर पोहोचला आहे. मात्र, आज मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याचं दिसून आलं. मुंबईत रविवारी 19,474 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर, आज सोमवारी दिवसभरात 13 हजार 862 रुग्ण आढळले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रालाही दिलासा देणारी ही बाब आहे.
मुंबईत दैनंदिन रुग्णांमध्ये घट झाली असून हा आकडा 20 हजारांवरून 13 हजारांवर पोहोचला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत दिवसभरात 13 हजार 648 नवे रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात बरे झालेले रुग्ण 27 हजार 214 असून आज 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थिती मुंबईतील सक्रीय रुग्णसंख्या 1 लाख 3 हजार 832 एवढी आहे.
मुंबईत जानेवारी महिन्यात आतापर्यंत समोर आलेले रुग्ण असे... -
01 जानेवारी- 6347
02 जानेवारी- 8063
03 जानेवारी- 8082
04 जानेवारी- 10860
05 जानेवारी- 15166
06 जानेवारी- 20181
07 जानेवारी- 20971
08 जानेवारी- 20318
09 जानेवारी- 19474
10 जानेवारी- 13,648
महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात शनिवारी 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. तर रविवारी 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. मुंबईचा विचार करता, एकट्या मुंबईत रविवारी 19,474 कोरोना बाधित रुग्ण समोर आले होते. मात्र, गेल्या 24 तासांत या रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याने नागरिकांना दिलासादायक वृत्त मिळाले आहे.