Corona virus: 18 मंत्र्यांच्या बिलातही राष्ट्रवादीचाच सर्वाधिक खर्च, तुलनेत शिवसेना 3 ऱ्या स्थानावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:45 PM2022-04-22T12:45:53+5:302022-04-22T12:46:06+5:30
"सरकारकडे फक्त मंत्र्यांवर उधळण्यासाठी पैसे आहेत. जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?" असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे.
मुंबई - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाकाळात राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनाचा संसर्ग झालेल्या या मंत्र्यांपैकी १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र, या मंत्र्यांवरील उपचारांसाठी तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च सरकारी तिजोरीतून करण्यात आला असून, त्यात सर्वाधिक ३४ लाख ४० हजार रुपये खर्च हा आरोग्यमंत्री राजेश टोपेंवरील उपचारांसाठी झाला आहे. तर, 18 पैकी राष्ट्रवादीच्या 8, काँग्रेसच्या 6 आणि शिवसेनेच्या 4 मंत्र्यांवर पैसा खर्च झाला आहे.
"सरकारकडे फक्त मंत्र्यांवर उधळण्यासाठी पैसे आहेत. जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?" असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सराकरमधील अनेक प्रमुख मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर उपचारांसाठी मंत्रिमहोदयांकडून सरकारी रुग्णालयांऐवजी खासगी रुग्णालयांनाच प्राधान्य देण्यात आले. विशेष म्हणजे निधी वाटपात शिवसेना तिसऱ्या स्थानावर होती, यावरुन भाजपने विधानसभेतही भाष्य केलं होतं. आता, रुग्णालय बिलाच्या खर्चातही शिवसेना तिसऱ्याच स्थानावर असल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांनी रुग्णालय बिलासाठी जवळपास 78 लाख 77 हजार रुपये खर्च केले आहेत. तर, काँग्रेसच्या 6 मंत्र्यांनी 33 लाख 08 हजार रुपये खर्च करत दुसऱ्या स्थानावर आहेत. तर शिवसेना येथेही तिसऱ्या स्थानावर असून शिवसेनेच्या 4 मंत्र्यांनी मिळून 28 लाख 54 हजार रुपये खासगी रुग्णालयातील बीलापोटी खर्च केला आहे. राज्य सरकारमधील या सर्व एकूण 18 मंत्र्यांचा खर्च एकूण 1 कोटी 40 लाख रुपयांचा आहे.
राष्ट्रवादीचे 8 मंत्री
राजेश टोपे - ३४ लाख ४० हजार
हसन मुश्रिफ - १४ लाख ५६ हजार
जितेंद्र आव्हाड - ११ लाख ७६ हजार
छगन भुजबळ - ९ लाख ३ हजार
जयंत पाटील - ७ लाख ३० हजार
दत्तात्रेय भरणे - १ लाख ५,८८६
प्राजक्त तनपुरे - ३८ हजार ९९८
नवाब मलिक - २६ हजार ५२०
दरम्यान, कोरोनाबाधित मंत्र्यांनी उपचारांसाठी खासगी रुग्णालयांना प्राधान्य देऊन त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून वसूल केल्याने आता राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे 6 मंत्री
नितीन राऊत - १७ लाख ६३ हजार
सुनील केदार - ८ लाख ७१ हजार
अशोक चव्हाण - २ लाख २८,१८४
विजय वडेट्टीवार - २ लाख ४,०४५
के. सी. पाडवी - १ लाख २५,२८४
सुनिल केदार - १ लाख १५,५२१
शिवसेनेचे 4 मंत्री
अब्दुल सत्तार - १२ लाख ५६ हजार
सुभाष देसाई - ६ लाख ९७ हजार
अनिल परब - ६ लाख ७९ हजार
संजय बनसोडे - २ लाख २०,६६१