Corona Virus: गुडन्यूज! कोरोनामुळे आज एकही मृत्यू नाही, तब्बल 23 महिन्यांनी उजाडला चांगला दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 09:01 PM2022-03-02T21:01:18+5:302022-03-02T21:10:29+5:30
कोरोनाबाधित सक्रिय रूग्णांची दिवसेंदिवस कमी होताना आकडेवारीतून दिसत आहे.
मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून मृत्युदरही कमी झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, 14 जिल्ह्यात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असून नाट्यगृह आणि सिनेमागृह 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये आणखी एक गुडन्यूज म्हणजे राज्यात कोरोनामुळे आज एकही रुग्ण दगावला नसल्याची नोंद झाली आहे.
कोरोनाबाधित सक्रिय रूग्णांची दिवसेंदिवस कमी होताना आकडेवारीतून दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू होण्याची सुरूवात झाल्यापासून पुणे शहरात तब्बल वीस महिन्यांनतर तीन अपवाद वगळता प्रथमच कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे वृत्त समोर आले होते. स्वत: महपौर मुरलीधर मोहोळ यांनी यांसदर्भात ट्विट करुन माहिती दिली होती. त्यानंतर, आता राज्यात आज कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
राज्यात आज 544 नवीन रुग्णांचे निदान झाले असून रिकव्हरी रेट 98.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा असून आज एकही मृत्यू झाला नाही. राज्यात 1 एप्रिल 2020 नंतर हा पहिला दिवस आहे, ज्यादिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. म्हणजेच तब्बल 23 महिन्यानंतर हा दिवस पाहायला मिळाला आहे. त्यामुळे, आता कोरोना आटोक्यात आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मास्क बाबत काय म्हणाले होते आरोग्यमंत्री
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यात दैनंदिन 48 हजारांपर्यंत रुग्ण आढळत होते. आता ही संख्या 500 ते 700 वर आली आहे, तर राज्यात दोन हजार ॲक्टिव्ह पेशंट आहेत. त्यामुळे तिसरी लाट जवळजवळ संपल्याची स्थिती आहे, असे असले तरी कोरोना संपला आहे असे समजून चालणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. त्यामुळे मास्क मुक्ती आणि इतर निर्बंध हटविण्याचे निर्णय विचारपूर्वकच घेतले जाणार आहेत, असे राजेंनी टोपेंनी तीन दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यानंतर, आज 14 जिल्ह्यात निर्बंध उठविण्यात आले आहेत.
निर्बंध शिथिल
या 14 जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने हॉटेल्स, सिनेमा आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच पर्यटन आणि धार्मिकस्थळेही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाट्य, सिनेमासह पर्यटन आणि हॉटेल व्यवसायालाही मोठा दिलासा मिळाला आहे. इतर जिल्ह्यात हॉटेल, सिनेमा आणि नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, निर्बंध शिथील करण्यात आले तरी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने राज्यात लागू असलेले नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आता नवी नियमावली जारी केली आहे. यानुसार राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या जिल्ह्यांचा समवेश
कोरोनाची स्थिती सुधारत असलेल्या जिल्ह्यांचा समावेश ‘A’ श्रेणीत करण्यात आला असून उर्वरीत जिल्ह्यांचा समावेश ‘B’ श्रेणीत करण्यात आला आहे. A श्रेणीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे.