आयसीएमआरचा अभ्यास : मुंबईकरांच्या आराेग्यास धोका नसल्याचा पालिकेचा खुलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना विषाणूचे संक्रमण आता मुंबईतील मलःनिसारणाच्या पाण्यातही आढळले आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने अभ्यासासाठी मुंबईतून सहा ठिकाणांहून नमुने जमा केले. या सर्व नमुन्यांमध्ये कोरोनाचा विषाणू आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली. मात्र, आता मलनिस्सारण वाहिनीच्या पाण्यावर प्रक्रिया करूनच ते समुद्रात सोडले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आराेग्यास धोका नसल्याचा खुलासा पालिकेने दिली.
आयसीएमआरने मुंबईत वडाळा, धारावी, कुर्ला, शिवाजीनगर, मालाड, कांजूरमार्ग या सहा ठिकाणी सर्वेक्षण करून तेथील मलनिस्सारण वाहिनीच्या पाण्याचे नमुने गोळा केले होते. त्यात १६ मार्चच्या आधी घेतलेल्या नमुन्यांत कोरोना विषाणू आढळून आला नव्हता. मात्र, ११ ते १६ मे दरम्यान घेतलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळून आल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॅजीच्या तज्ज्ञांनी आयसीएमआरसह संयुक्तपणे हा अभ्यास केला. दरम्यान, मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येते. त्यात सुमारे एक टक्के कर्मचारीच पॉझिटिव्ह आढळतात, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
* तीन टप्प्यांत केले नमुने गाेळा
संशोधकांच्या माहितीनुसार, मलनिस्सारण वाहिन्यांमधून तीन टप्प्यांतील नमुने गोळा करण्यात आले होते. त्यात मध्यम टप्प्यात असलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळला. २००१ सालीही पोलिओ विषाणूच्या संक्रमणाच्या स्थितीत अशा स्वरूपाचा अभ्यास करण्यात आला होता.
--------------------