Join us

Corona virus : कोरोनाच्या नियंत्रणासाठी पोलिसांकडून ‘१४४’ची मात्रा, खासगी टूर्सवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 7:11 AM

सीआरपीसी कायद्याच्या कलम १४४ अन्वये एका ठिकाणी पाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोक जमू शकत नाहीत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी ३१ मार्चपर्यंत शहरात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खासगी टुर्सच्या आयोजनावर बंदी घातली आहे. या आदेशाचा भंग जे करतील, त्यांच्यावर फौजदारी दंड संहिता (सीआरपीसी) नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले.सीआरपीसी कायद्याच्या कलम १४४ अन्वये एका ठिकाणी पाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोक जमू शकत नाहीत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. हे प्रतिबंधात्मक आदेश फक्त कोरोना व्हायरस जास्त प्रमाणात पसरू नये, यासाठी बजावल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोरोनाबाबत घाबरून न जाता काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शिवाय मास्कचा वापर करत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही प्रणय अशोक यांनी नमूद केले.कारोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी या नियमांचे पालन करावे, याबाबत मुंबई पोलिसांकड़ून आवाहन करण्यात येत आहे. खासगी टुर्स गाइड, आयोजकांवर मुंबई पोलीस लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियावरील अफवांवर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत.मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनीही टिष्ट्वटरच्या माध्यमातून मुंबईकरांना गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक, घरगुती व सार्वजनिक स्वच्छता राखू या, मोठे समारंभ, गर्दी अनावश्यक प्रवास टाळू या, अफवांपासून दूर आणि डॉक्टरांच्या जवळ राहू या, धास्ती नको काळजी घेऊ, कोरोनावर मात करू, असे टिष्ट्वटमध्ये नमूद केले आहे.काय आहे कलम १४४?कोणत्याही शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यास, कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात येते. सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम १४४ शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केले जाते. जमावबंदीचा आदेश लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किंवा त्या दर्जाचे अधिकारी देतात. जमावबंदी लागू केल्यानंतर ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोक एका ठिकाणी जमू शकत नाहीत, तसेच शस्त्र घेऊन जाण्यासही बंदी असते.शिक्षा : कलम १४४ चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला कलम १०७ किंवा कलम १५१ अंतर्गत अटक करू शकतात. जमावबंदीचे उल्लंघन केले, तर १ वर्षाची शिक्षा होऊ शकते. शस्त्रांसह असेल, तर दोन वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे. शस्त्र बाळगले नसेल, तर बेकायदा जमाव करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहा महिन्यांपर्यंत शिक्षा व दंड होऊ शकतो. जमावाने जर हिंसा केली किंवा बळाचा वापर केला, तर त्याला दंगल असे म्हणतात व यासाठी दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.- अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर, सरकारी वकील

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस