Corona Virus: मुंबईत 3 ऱ्या दिवशीही 20 हजार रुग्ण, कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 07:48 PM2022-01-08T19:48:47+5:302022-01-08T19:49:37+5:30
Corona Virus: मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ २० हजारांवर पोहोचल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असं विधान काही दिवसांपूर्वी चहल यांनी केलं होतं.
मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असताना मुंबई हे रुग्णवाढीचं केंद्रस्थान बनलं आहे. मुंबईत काल आणि आजही दैनंदिन रुग्णवाढ २० हजारांच्यावर पोहोचली आहे. त्यामुळे, रुग्णवाढीचा वेग थांबता थांबेना झाल्याचं दिसून येत आहे. मात्र, महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी लॉकडाऊनची गरज नसल्याचे विधान केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यातच, आज पुन्हा गेल्या २४ तासांतील कोरोना रुग्णांची मुंबईतील आकडेवारी तब्बल २० हजारांवर गेली आहे. दिवसभरात मुंबईत २०,३१८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ २० हजारांवर पोहोचल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असं विधान काही दिवसांपूर्वी चहल यांनी केलं होतं. आता मुंबईत दैनंदिन रुग्णवाढीनं २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आजही मुंबईत २०,३१८ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ५ कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्यस्थिती मुंबईत १ लाख ६ हजार ३७ सक्रीय रुग्ण आहेत.
महाराष्ट्र: मुंबई में पिछले 24 घंटे में #COVID19 के 20,318 नए मामले सामने आए हैं। इस दौरान 5 लोगों की मृत्यु दर्ज़ की गई।
— ANI_HindiNews (@AHindinews) January 8, 2022
कुल सक्रिय मामले: 1,06,037 pic.twitter.com/jX3qY1Fdzi
मुंबईत तूर्तास लॉकडाऊन नाही
मुंबईत लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर खुद्द इकबाल सिंह चहल यांनीच शुक्रवारी भूमिका स्पष्ट केली. मुंबईतील सध्याची रुग्णवाढीची स्थिती पाहाता लॉकडाऊनची गरज नाही, असं आयुक्त चहल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तीन दिवसांपासून २० हजारांचा टप्पा पार
"मुंबईत गुरुवारी २० हजाराच्या वर रुग्णसंख्या होती. त्यापैकी फक्त ११० लोक ऑक्सिजनवर बेडवर आहेत. ११८० लोक रुग्णालयात दाखल आहेत आणि शहरात ३५ हजार बेड्सपैकी ५९९९ बेड्स व्यापलेले आहेत. म्हणजेच जवळपास ८४ टक्के बेड्स रिकामी आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर देखील नगण्य आहेत. बेड रिकामी आहेत. त्यामुळ शहरात लॉकडाऊनची गरज नाही", असं चहल यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, शुक्रवारी आणि आज शनिवारीही मुंबईत दैनिक रुग्णसंख्येनं २० हजारांचा टप्पा पार केला आहे.