मुंबई - देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून ओमायक्रॉनचेही रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. नुकतेच मंत्रालयातील तीन कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर, आज मुंबईतील रुग्णसंख्या 4 हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे, राज्यात कडक निर्बंध लावण्याबाबतचा विचार सुरू आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असेही स्ष्ट केले. मात्र, कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे त्यांनीही सूचवले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क लावत नसल्याने मीही मास्क घालत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटलंय.
शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत हे पक्षाच्या कामानिमित्त नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील राजकारण आणि देशातील विविध घडामोंडीवर भाष्य केलं. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यावरही त्यांनी आपलं मत मांडलं. मात्र, त्यांच्या तोंडाला मास्क नसल्याने पत्रकारांनी त्यांना मास्क परिधान न करण्याबाबत विचारले. त्यावर, त्यांनी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अनुकरण करतो, असे उत्तर दिलं.
राज्यात निर्बंध आले की पुन्हा एकदा महाराष्ट्राचे अर्थचक्र अडकून पडेल. नोकरी, काम, रोजगार यावर फार मोठे संकट येईल. ते येऊ नये, असे वाटत असेल तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आपले पंतप्रधान जरी मास्क लावा सांगत असतील तरी स्वत: मास्क लावत नाहीत. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांचे ऐकतो आणि मास्क लावत नाही. मुख्यमंत्री मास्क लावतात पण मोदी देशाचे नेते असून कुठेही मास्क लावत नाहीत. मोदी मास्क लावत नसल्याने लोकही लावत नाहीत आणि मीही त्यांचे आचरण करतो. त्यामुळे पंतप्रधान मोदींनीही मास्क लावावा आणि नियमांचे पालन करावे, असे खोचक आवाहन संजय राऊत यांनी केले.