मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या दोन कोरोना रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. त्याचप्रमाणे, गुरुवारपर्यंत कोरोना विषाणूसंदर्भातील २० जणांचे वैद्यकीय अहवाल प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली. गुरुवारपर्यंत मुंबई विमानतळावर १ लाख ९६ हजार ७६२ रुग्णांची तपासणी झाल्याची नोंद आहे.
कोरोना रुग्णांच्या निकटवर्तीयांचा शोध घेतला असता, त्यात अतिजोखमीच्या गटात तीन निकटवर्तींना कस्तुरबा विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. तर कमी जोखमीच्या गटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने बुधवारी रात्री १०६ घरांची तपासणी केली. या तपासणीत कोरोनाबाबत एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही.१९१६ हेल्पलाइन क्रमांकसध्या २४ विभागांतील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या टीम संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करीत आहेत. गुरुवारपर्यंत ६५२ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला, तर आतापर्यंत १९० रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर वैद्यकीय अधिकारी २४ तास कोरोनाविषयी माहिती देत आहेत.रेल्वे प्रवासी संघटनेकडून कोरोनाविषयी प्रवाशांमध्ये जागृतीकेंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोना विषाणूबाबत काळजी आणि दक्षता घेण्याचे आवाहन करीत आहे. यासह आता रेल्वे प्रवासी संघटनांकडूनही प्रवाशांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार, गुरुवारी लोकल, रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनांकडून काय करावे, काय करू नये, याची माहिती प्रवाशांना देण्यात आली.
महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटना आणि क्षेत्रीय रेल्वे प्रवासी समिती सदस्य यांच्या वतीने कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली. संघटनेच्या सदस्यांनी कल्याण ते सीएसएमटी लोकलमध्ये प्रवास करून लोकलमधील प्रवाशांना मास्क वापरा, सध्या स्थानकावरील स्टॉलवरील वस्तू खाऊ नका, उगाच धक्काबुक्की करू नका, अशा सूचना दिल्या.
महिला प्रवाशांनी स्कॉर्फकिंवा मास्कचा वापर करावा. लोकल प्रवासानंतर शक्य असल्यास हात-पाय धुऊन कार्यालय किंवा घर गाठावे. प्रवाशांनी खोकताना किंवा शिंकताना हातरूमाल वापरायला विसरू नये. याशिवाय रेल्वे प्रवासात कुठेही थुंकू नये. स्वच्छ पाणी प्यावे, अशा सूचनाही प्रवाशांना देण्यात आल्या. संघटनेच्या सदस्यांनी स्थानकावरील स्टॉलचालकांना स्वच्छता ठेवण्याचीही सूचना केली. कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने खबरदारी बाळगली पाहिजे. जेणेकरून कोरोनाचा प्रसार होणार नाही, असे आवाहन क्षेत्रीय रेल्वे प्रवासी समिती सदस्या वंदना सोनावणे यांनी केले.