CoronaVirus News in Mumbai : कुर्ला, चेंबूर, गोवंडीत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 05:08 AM2020-05-17T05:08:54+5:302020-05-17T05:09:26+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : वरळी, धारावी प्रमाणेच कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या विभागांमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येथे प्रभावी उपाययोजनांसाठी शुक्रवारी विशेष बैठक बोलावली होती.
मुंबई : कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या विभागात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे या साथीच्या आजारावर प्रभावी उपाय योजना करण्यासाठी या विभागांमधील गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या सोसायटीतील सदस्यांची तपासणी करून घेणे, झोपडपट्टी विभागातील सार्वजनिक शौचलयांचे वारंवार निर्जंतुकीकरण, प्रत्येक विभागातील रुग्णालयांमध्ये खाटा राखून ठेवण्याचा निर्णय एका विशेष बैठकीत घेण्यात आला आहे.
वरळी, धारावी प्रमाणेच कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या विभागांमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येथे प्रभावी उपाययोजनांसाठी शुक्रवारी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्याचे मंत्री नवाब मलिक तसेच परिमंडळ पाच अंतर्गत येणाऱ्या एल, एम पूर्व, एम पश्चिम या तीन विभागांचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
सोसायटीने स्वखर्चाने थर्मल गन व पल्स आॅक्सीमिटर करावे, तापाच्या रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करणे अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
झोपडपट्टी विभागात विशेष पथक
झोपडपट्टी विभागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे झोपडपट्टी विभागामध्ये आरोग्य सेविका, होमगार्ड, स्थानिक स्वयंसेवक यांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकाच्या माध्यमातून प्रत्येक घरामधील सदस्यांना बाहेर बोलावून त्यांचे तापमान व वरिष्ठ नागरिकांच्या शरीरामध्ये आॅक्सिजनचे प्रमाण तपासावे, असे बैठकीत निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर झोपडपट्टी विभागातील सार्वजनिक शौचालयांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तर बाधित क्षेत्रातून कोणीही बाहेर जाऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त व स्थानिक कार्यकत्र्यांचा पहारा असणार आहे.