CoronaVirus: मुंबईत कोरोनाबाधिताची संख्या १० हजारावर जाण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 03:27 AM2020-04-23T03:27:56+5:302020-04-23T07:09:16+5:30
अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली शक्यता; ‘टारगेटेड’ तपासण्या सुरु केल्याने संख्या वाढण्याचा अंदाज
- अतुल कुलकर्णी
मुंबई : मुंबईतील अनेक खासगी रुग्णालये कोरोनामुळे बंद पडली आहेत, तर अनेक ठिकाणी डॉक्टर्स स्वत:च क्वारंटाईन झाले आहेत. दुसरीकडे ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत पण ते क्वांटनमेंटमध्ये आहेत, त्यांच्या तपासण्या थांबवून ‘टारगेटेड’ तपासण्या सुरु केल्यामुळे मुंबईत रुग्णांची संख्या येत्या काही दिवसात १० हजाराच्या आसपास जाईल, अशी भीती अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत ३० एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या वाढू शकते असे या व्यवस्थेत काम करणाºयांचे मत आहे. मुंबईत तातडीने खूप गांभीर्य दाखवण्याची वेळ आली आहे, असे मत अनेक डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, जे हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले आहेत, त्याच्या चारही बाजूच्या रहिवाश्यांची तपासणी झाली पाहिजे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या सर्रास देणे योग्य नाही, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांना या गोळ्या देऊन चालणार नाही, कन्टेंनमेंट केलेले भाग किल्ल्यासारखे कडेकोट बंद करण्याची गरज आहे. झोपडपट्टीत लक्षणे आढळणाऱ्यांना तेथून सरळ बाहेर काढून क्वारंटाईन करण्याची गरज आहे. प्रत्येक बेडजवळ ऑक्सिजन ठेवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे; पण त्यासाठी ऑक्सिजन पाईलपाईनसह अनेक तांत्रिक आणि वैद्यकीय अडचणी आहेत. वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि मुंबई महापालिका यांच्यात समन्वय दिसत नसल्याचे मत काही अधिकाºयांनी व्यक्त केले. नव्याने बेड तयार करत बसण्यापेक्षा काही मोठी खासगी हॉस्पीटल; सगळ्या गोष्टींनी सुसज्ज आहेत त्यांना ताब्यात घेणे गरजेचे आहे, पण त्यावरही कोणी पटकन निर्णय घेत नाही, एका खाजगी लॅबला तातडीने रिपोर्ट द्या असे सांगण्यात आले, त्यास त्यांनी नकार दिला व तपासण्या करणेच बंद केले आहे. त्यामुळे आपलेच नुकसान होत आहे, ज्या इमारतीत रुग्ण आढळला ती सील केली जाते पण तेथे असणाºया अन्य लोकांच्या तपासण्या गतीने होत नाहीत, अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत.
याबद्दल मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारले असता ते म्हणाले, अतिजोखिम असलेल्या व्यक्तिंच्या संपर्कात जे आले त्यांना आधी तपासले जात आहे. शिवाय आम्ही तपासणीची पद्धती टागरेटेड केली आहे. त्यामुळे रुग्ण वाढताना दिसत आहेत. वरळीत जेव्हा लोक आढळले तेव्हा आम्ही त्यांना एनएसई डोम, पोतदार कॉलेजमध्ये ठेवले, ते आता बरे झाल्याने त्यांंना आम्ही घरी पाठवले. कोविड, नॉन कोविड असे हॉस्पीटलही तयार केले आहेत. ज्यांना स्वत:च्या घरात क्वारंटाईन करण्याची सोय आहे त्यांनाच घरी ठेवले जात आहे, असे सांगितले. शिवाय झोपडपट्टी भागात जे जे लोक रुग्णाच्या सानिध्यात आले त्यांना तातडीने तेथून बाहेर काढले आहे असेही काकाणी यांचे म्हणणे आहे.
फडणवीस यांच्या आरोपावर मनपाचे मत
नायर हॉस्पीटलमध्ये जवळपास ४० मृत व्यक्तींचे पार्थिव कोरोनाची तपासणी न करताच परस्पर नातेवाईकांना देण्यात आल्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. त्यावर काकाणी म्हणाले, आम्ही साधारण तीन आठवड्यापूर्वी ज्यांच्यावर कोणीही हक्क सांगितलेला नाही अशा शवागारातील बॉडीजची विल्हेवाट लावा असे पत्र दिले होते. अनेक दिवसापासून त्या बॉडीज शवागारात बेवारस होत्या. त्यांची विल्हेवाट लावली गेली आहे. नायर हॉस्पीटलमध्ये कोरोनाचे रुग्ण ठेवण्यास काहींचा विरोध आहे, त्यातूनही हा विषय पुढे आल्याचे बोलले जात आहे.