corona virus : निरीक्षणाखालील राज्यातील सर्व ३७ प्रवासी निगेटिव्ह, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 07:57 PM2020-02-10T19:57:40+5:302020-02-10T20:00:48+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ३७ प्रवाशांपैकी ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ३७ प्रवाशांपैकी ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्या सर्व ३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. नवी मुंबई मध्ये भरती असलेल्या एका जणाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या ३ जणांपैकी दोघे पुणे येथील नायडू रुग्णालयात तर १ जण जिल्हा रुग्णालय, सांगली येथे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २३ हजार ३५० प्रवाशांची तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून १६६ प्रवासी आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान शहरातून येणा-या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १६६ प्रवाशांपैकी ७२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी राज्य नियंत्रण कक्ष, पुणे येथील ०२०/२६१२७३९४ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच त्यासाठी टोल फ्री क्रमांक १०४ ची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.