मुंबई – येत्या १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील सर्वाचं लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लस पुरवठा राज्याला लागणार आहे. सीरम आणि भारत बायोटेकने आपापल्या लसीचे दर निश्चित केले असून त्यांच्या उत्पादनातील ५० टक्के साठा केंद्र सरकारसाठी राखीव आहे.उर्वरित साठा राज्य सरकारला खरेदी करावा लागेल. मात्र २० मे पर्यंत महाराष्ट्राला लस पुरवता येणार नाही असं सीरम इन्सिट्यूटने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. कारण २० तारखेपर्यंतचा साठा आधीच केंद्र सरकारने बुक करून ठेवला आहे.
याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले राज्यात १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीचे डोस आवश्यक आहेत. २० मे पर्यंत मोदी सरकारने स्टॉक बुक करून ठेवल्याने राज्याला लस मिळणार नाही असं सीरमने कळवलं आहे. मग १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस कशी द्यायची हा प्रश्न आहे. कोरोनाच्या इतक्या महिन्याच्या कालावधीत आपण लसीच्या तुटवड्याबद्दल साधी चर्चा करू शकत नाही. मोदीजी, तुमची रणनीती कुठे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
लसीचा पुरवठा कसा करायचा यावर पर्याय नाही. मोदी सरकारने २ कंपन्यांच्या पुरवठ्यावर मर्यादा आणल्या आहेत. आता राज्य सरकारने लस खरेदी करून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस द्यावी असं म्हटलं जातं. ४५ वयोगटावरील नागरिकांबाबत केंद्र सरकार काळजी घेईल. संपूर्ण देशभरात लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होईल याबाबत तारीख सांगू शकता का? असंही सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं आहे.
राज्य सरकारचं भारत बायोटेक आणि सीरमला पत्र
१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी १२ कोटी डोसेस लागतील. त्याच्या उपलब्धते विषयी आरोग्य विभागामार्फत सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. लसीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून एवढ्या मोठ्या संख्येच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे मोठे आव्हान आहे. ही लस सरसकट मोफत द्यायची की आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल. त्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने पाठविला आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार लसीकरणाची वेळ निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे १ मेपासून लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले आहे.