Join us

Corona Virus : मंत्रालयातील तीन कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉनची लागण, तिघेही विलगीकरणात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 10:09 PM

मंत्रालयातील तीन कर्मचाऱ्यांना ओमायक्रोनची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामध्ये, 2 पोलीस आणि 1 लिपिकाचा समावेश आहे.

ठळक मुद्दे दिलासादायक बाब म्हणजे तिघेही रुग्ण लक्षणविरहित असल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे. मात्र, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. 

कल्याण डोंबिवली/मुंबई - सध्या देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 82,000 एवढी आहे. यातच गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे, गेल्या 33 दिवसांनंतर एका दिवसात एवढे रुग्ण समोर आले आहेत. मुंबईत आज तब्बल 4000 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, मंत्रालयातील तीन कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

कल्याण डोंबिवलीतील तीन जणांचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. या तिघांनाही महापालिकेच्या आर्ट गॅलरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून तिघेही रुग्ण लक्षण विरहीत असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी दिली आहे. ओमायक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड झाला आहे की नाही यासाठी जेजे रुग्णालयाकडून तपासणी केली जाते. कल्याण डोंबिवलीतील तीन जण हे मंत्रालयात कार्यरत आहेत. त्यापैकी दोन जण पोलिस तर एक कारकून कर्मचारी आहे. त्यांची चाचणी मुंबईत करण्यात आली होती.

आरटीपीसीआर कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला असता त्यापैकी एका कर्मचाऱ्याने महापालिकेस कळविले. त्याला महापालिकेच्या आर्ट गॅलरीत २० डिसेंबर रोजी दाखल करण्यात आला होता. उर्वरीत दोन पोलिसांच्या आरटीपीसीआर कोरोना चाचणीचा रिपोर्टही पॉझीटीव्ह आला. हे दोन्ही पोलिस होम आयसोलेशनमध्ये होते. या तिघांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगला पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट आज प्राप्त झाला असून तिघाही जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निषन्न झाले आहे. उर्वरीत दोन जण जे होम आयसोलेशनमध्ये होते. त्यांनाही महापालिकेच्या आर्ट गॅलरीच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे. दिलासादायक बाब म्हणजे तिघेही रुग्ण लक्षणविरहित असल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे. मात्र, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. 

मुंबईत वाढले रुग्ण

मुंबईत आज ३,६७१ रुग्णांची नोंद झाली आहे. काल हाच आकडा २,५१० इतका होता. गेल्या २४ तासांत ३७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता ९६ टक्क्यांवर आलं आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा ११,३६० वर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५०५ दिवसांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर काल ०.१० टक्के इतका होता. आज त्यात वाढ होऊन ०.१४ टक्के इतका झाला आहे. मुंबईतील सातत्यानं होणारी रुग्णवाढ आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. 

मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील

ओमायक्रॉन आणि वाढती कोरोना पॉझिटीव्ही रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यातील टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. ''मुंबईत काल 2200 च्या दरम्यान रुग्ण आढळून आले होते, आज हीच रुग्णसंख्या 4 हजारांच्याजवळ पोहोचली आहे. मुंबईत एका दिवशीची आजची पॉझिटीव्हीटी 8.48 एवढी आहे. ठाण्याची 5.25, रायगड 4, पुण्याची 4.14 याचा अर्थ असा आहे की, 100 टेस्टमागे 5 ते 8 पर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. आजची परिस्थिती नक्कीच चिंता वाढवणारा विषय आहे. टास्क फोर्स आणि इतरांनी जी चर्चा केली. त्यानुसार, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात घेणार आहेत. आज किंवा उद्या याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील,'' असे राजेश टोपे यांनी सांगितले.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामंत्रालयओमायक्रॉनकल्याण डोंबिवली महापालिका