Corona Virus: कोरोना आता जागतिक महामारी; राज्यातील रुग्णांची संख्या अकरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 01:27 AM2020-03-12T01:27:49+5:302020-03-12T04:06:42+5:30
पुणे येथील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : जगभरात थैमान घालणारा कोरोना आता महामारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाचा एक रुग्ण कर्नाटकात मरण पावला असतानाच, या आजाराने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. कोरोनाचे आठ रुग्ण पुण्यात व दोन मुंबईत उपचार घेत आहेत. नागपूरमध्येही एक रुग्ण आढळल्याने राज्यातील रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटले आहे की, कोविड-१९ ला आता महामारी म्हटले जाऊ शकते. यासारखी महामारी कधी पाहण्यात आली नाही. आगामी दिवस व आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण व मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगण, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, पंजाब येथेही रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची व्हिडीओ कॉलद्वारे विचारपूस केली.
दुबईहून प्रवास करून आलेले पुण्यातील दोन प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यानंतर, त्यांच्या निकटवर्तीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर आहे. या रुग्णांसोबतचे मुंबईतील दोन सहप्रवासीही बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अकरा झाली असून पुण्यात ८ तर नागपूरमध्ये एक कोरोनोबाधित रुग्ण आढळला आहेत.
सध्या पुणे येथे १८ जण तर मुंबईत १५ जण भरती आहेत. या शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वाय.सी. एम. रुग्णालय पिंपरी-चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, बुधवारी सकाळी आरोग्यमंत्र्यांनी विभागाची आढावा बैठक घेतली. पुणे येथे कार्यान्वित असलेला नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जाणीवजागृती अधिक व्यापक करावी, अशा सूचना देतानाच, यासाठी सर्व माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून, राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ खाटा उपलब्ध आहेत.
१ लाख ३८ हजार ९६८ प्रवाशांची तपासणी
मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ मार्चपर्यंत १,१९५ विमानांमधील १ लाख ३८ हजार ९६८ प्रवासी तपासण्यात आले. ब्युरो आॅफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियातून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशांत सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने, २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून आतापर्यंत एकूण ६३५ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३७० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
३१२ जणांना डिस्चार्ज
१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३४९ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यंपैकी सर्व ३१२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत, तर ७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३४९ प्रवाशांपैकी ३१२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात
आले आहे.
ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
ठाणे जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये, तसेच तत्काळ उपाययोजना करता याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यामध्ये बुधवारपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्याची घोषणा केली.
या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांची नियुक्ती केली आहे, तसेच पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण, औद्योगिक विभाग, तसेच सेवाभावी संस्थांवर जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. सर्व विभागांनी आवश्यक कार्यवाही करून दैनंदिन अहवाल सादर करायचा आहे.
आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवायची आहेत, संशयित रु ग्णांसाठी स्वतंत्र रु ग्णवाहिकेची व्यवस्था करायची आहे, तसेच स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणे, जिल्ह्यातील रु ग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे इत्यादी कामे केली जाणार असून, हा कायदा लागू केल्यामुळे आता आवश्यकता भासल्यास खासगी रु ग्णालये, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. खासगी रु ग्णालये सहकार्य करीत नसल्याचे आढळून आल्यास अथवा मास्कची जादा दराने विक्र ी, औषधांची साठेबाजी केल्यास तत्काळ कारवाई करण्याचे अधिकार संबंधित विभागाला दिले आहेत. पोलीस यंत्रणेने समाजमाध्यमातून अफवा अथवा गैरसमज पसरविणारे शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. सार्वजनिक कार्यक्र म आयोजकांचे प्रबोधन करावे, असे आदेश नार्वेकर यांनी दिले आहेत. कौटुंबिक कार्यक्र मांना सार्वजनिक रूप आणू नका, तसेच मंदिर अथवा देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्या, घाबरू नका, पण सतर्क राहा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.