मुंबई - ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने मुंबईतील हॉटेल, उपहारगृह, बार, पब, डिस्कोथेपवर अधिक निर्बंध लावण्यात येणार आहेत. त्यानुसार या सर्व आस्थापनांना आता आसन क्षमता जाहीर करावी लागणार आहे. याबाबत शुक्रवारी रात्री उशिरा पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी परिपत्रक काढले.
सध्या हॉटेल, पब आदी ठिकाणी ५० टक्के क्षमतेने व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तरीही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पालिकेला आढळून आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्वांना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी आहे. मात्र, त्यांना आपल्याकडील आसन क्षमता जाहीर करावी लागणार आहे. बार, पब, डिस्कोथेप, रेस्टोरंट यांच्या परवान्यावर आसन क्षमता दिलेली असते. ती स्पष्टपणे दिसेल, अशा पध्दतीने लावण्याचे निर्देशही पालिकेने दिले आहेत.