लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - आषाढ महिना म्हणजे पावसाचा महिना, सण, उत्सवाचा महिना. याच महिन्यात नववधूला तिच्या माहेरी जाण्याचे वेध लागतात. पण, सध्या असलेले कोरोनाचे संकट आणि प्रवासावरील निर्बंध यामुळे तशी संधी यंदा मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे नववधू हिरमुसल्या आहेत.
कोरोनाच्या साखळीमध्ये संपूर्ण जग अडकले आहे. गेले सुमारे दीड वर्षे घरातच कोंडून घेतल्यासारखी अवस्था आहे. एरवी आषाढात नववधूंना त्यांच्या माहेरी जायची ओढ लागलेली असते. आई-बाबांना भेटायची तिला जशी ओढ असते, तशी आईही तिची वाट पाहत असते. सध्याच्या व्हिडिओ कॉलच्या जमान्यात समोरासमोर भेटीची संधी असली तरी प्रत्यक्ष माहेरी जाण्याला कसलाच पर्याय नाही.
लेक आणि जावई यांना मुक्कामाला बोलावून त्यांची हौसमौज करण्याची संधी या महिन्यात मिळते. पण, गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही कोरोनाचे संकट असल्याने त्यावर बंधने आली आहेत. मध्यंतरी सगळे खुले होत होते, पण पुन्हा तिसऱ्या लाटेची भीती सांगितली जात असल्याने या महिन्यात ठरलेले भेटीगाठींचे बेत लांबणीवर टाकले जात आहेत.
......
माझं लग्न या वर्षीच्या सुरुवातीला झालं. त्यामुळे आषाढ महिन्यात सुरू होणारे सण माझ्यासाठी खूप विशेष आहेत. माहेरी राहण्यासाठी जायला मिळणार होते, पण कोरोनामुळे ते यंदा शक्य होणार नाही. एखादा दिवस तरी जाण्याचा प्रयत्न करणार आहे.
ऐश्वर्या शेलार-कदम
....
जावई आणि लेक पहिल्यांदा घरी हक्काने येणारा असा हा आषाढ महिना पण, माझ्या मुलीचा हा सण कोरोनामुळे रीतसर होणार नाही. प्रवासावर बंधने आहेत. पहिलाच सण वाया घालवायचा नाही. पाहूया कसे जमते ते.
संगीता कदम, आई
....
आषाढ महिना नवविवाहित मुलींसाठी खूप महत्त्वाचा. शास्त्रानुसार रीतीनं मुलगी माहेरी जाते. पण मी मुंबईत आणि आई गावी आहे. त्यामुळे माहेरी जाता येणार नाही. कोरोना आटोक्यात आल्यावर आम्ही भेटू आणि साजरे करू.
- पूनम शेडगे- सावंत
.....
लेकीचं लग्न झाल्यापासून ती माहेरी राहायला आलेली नाही. आषाढात हक्काने लेकी घरी येतात, राहतात. पण, मी गावी अडकले आणि ती मुंबईत. फोनवर कितीही बोललो तरी मायलेकीची भेट झाली नाही. याचं वाईट वाटतंच.
- कल्पना सावंत
.....