लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेना याेद्धे असलेले आणि बेस्टचे वाहक म्हणून काम करणारे प्रभाकर तांबे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यांचे कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहे. सातत्याने पत्रव्यवहार करूनही तुमच्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला मदत मिळणार नाही, असे उत्तर बेस्टने दिल्याचे तांबे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
उदय प्रभाकर तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट प्रशासनात नोकरी करणारे त्यांचे वडील कोरोना याेद्धा प्रभाकर धनू तांबे यांच्या पश्चात परिवाराला बेस्ट प्रशासन काहीही मदत करण्यास तयार नाही. प्रभाकर तांबे हे दिंडोशी बस आगारात वाहतूक विभागात बस वाहक म्हणून काम करत होते. त्यांचा १ जून २०२० रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात घरात कमविणारे कोणी नाही. त्यामुळे त्यांच्या पश्चात मला बेस्टमध्ये नोकरी मिळावी. शासनाने जाहीर केलेल्या विम्याचे पैसे मिळावेत, यासाठी बेस्ट प्रशासनाकडे अर्ज केेल्याचे उदय यांनी सांगितले. पाठपुरावा सुरू असतानाच त्यांना बेस्ट भवनातून फोन आला आणि तुमच्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळणार नाही. म्हणून तुम्ही पुन्हा दुसरा अर्ज भरा. यासाठी तुम्हाला बेस्ट भवनात यावे लागेल, असे सांगण्यात आल्याचे उदय यांनी सांगितले.
दरम्यान, बेस्टकडून मिळत असलेल्या अशा वागणुकीमुळे उदय यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांचे निधन कोरोनामुळे झाले आहे, असे मनपाने दिलेल्या सर्टिफिकेटवर नमूद आहे. मात्र बेस्ट यास दाद देत नाही. यामुळे मानसिक त्रास होत असून, न्याय मिळावा, असे त्यांचे म्हणणे आहे. उदय तांबे यांच्यासाठी माजी खासदार हुसेन दलवाई यांनीही बेस्ट प्रशासनास पत्र लिहिले आहे. तसेच फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री सहित बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
.................................